esakal | तब्बल दीड हजार शेतकऱ्यांची अडकली कर्जमुक्ती; तांत्रिक अडचणी, चुकीच्या माहितीमुळे अडचण
sakal

बोलून बातमी शोधा

farmers are not getting loan relief due to technical errors in banks

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यानंतर महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना जाहीर केली. या योजनेत दोन लाख रुपये कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यात आले आहे.

तब्बल दीड हजार शेतकऱ्यांची अडकली कर्जमुक्ती; तांत्रिक अडचणी, चुकीच्या माहितीमुळे अडचण

sakal_logo
By
चेतन देशमुख

यवतमाळ: शासनाच्या महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर कर्जमुक्ती झाल्यासंदर्भात संदेश आलेले आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी आधार कार्ड प्रमाणीकरण न केल्याने व चुकीची माहिती अपलोड झाल्याने, तर काही ठिकाणी तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास दीड हजार शेतकऱ्यांची कर्जमुक्ती अजूनही अडकलेली आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यानंतर महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना जाहीर केली. या योजनेत दोन लाख रुपये कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यात आले आहे. या योजनेसाठी जिल्ह्यातील एक लाख आठ हजार शेतकरी पात्र ठरलेले होते. त्यातील एक लाख एक हजार शेतकऱ्यांची यादीदेखील अपलोड करण्यात आलेली आहे. 

अधिक वाचा - जेवताना पोळी कधी आणि किती खावी? जाणून घ्या आहारतज्ज्ञ डॉ. कविता गुप्ता यांच सल्ला

आतापर्यत 91 हजार जणांची माहिती आलेली असून, 89 हजार शेतकऱ्यांच्या बॅंकेतील खात्यांमध्ये रक्कम जमा झालेली आहे. मात्र, अजूनही दीड हजार शेतकरी कर्जमुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातील अनेकांना कर्जमुक्तीचे संदेश आलेले आहेत. मात्र, कर्जमुक्ती झालेल्या शेतकऱ्यांच्या यादीत नावे आलेली नाहीत. त्याचा परिणाम म्हणून संबंधित शेतकरी संभ्रमाव्यस्थेत दिसून येत आहेत. 

कर्जमुक्ती होईल की नाही, अशी भीती शेतकऱ्यांना आहे.नाव अपलोड करताना तसेच महाऑनलाइन पोर्टल वर नावे अपलोड करताना चुका झाल्या. प्रमाणीकरण व्यवस्थित झाले नाही तर काही ठिकाणी मोजक्‍याच खात्यांची माहिती दिली. त्यामुळे अडचणीत येत आहेत. परिणामी अजूनही जिल्ह्यातील जवळपास दीड हजार शेतकरी कर्जमुक्ती होण्याच्या प्रतीक्षेत असून, यावर तातडीने आवश्‍यक तो तोडगा काढण्याची मागणी ते करीत आहेत. 

आधीच शेतकरी अनेक अडचणींमध्ये सापडलेले आहेत. सोयाबीन बियाणे न उगवणे, पावसामुळे सोयाबीनला बसलेला मोठ्या प्रमाणात फटका अशा अनेक अडचणी आजही शेतकऱ्यांसमोर उभ्या आहेत.

अशा बिकट परिस्थितीतच आता कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र असूनदेखील कर्जमुक्तीच्या यादीत नाव दिसत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झालेली आहे. त्यामुळे आता शासनाकडून कर्जमाफी झाल्याबाबतची रक्कम आपल्या बॅंकेतील खात्यात कधी जमा होणार, याकडेच जिल्ह्यातील संबंधित पात्र शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.

सविस्तर वाचा - अचानक का कमी झाली कोरोना बाधितांची संख्या? अतिशय धक्कादायक कारण आले समोर

शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. त्यांनी संबंधित बॅंक व सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे माहिती द्यावी. व्हेरिफिकेशन व इतर बाबींची पडताळणी झाल्यानंतर जिल्ह्यातील संबंधित पात्र शेतकऱ्यांच्या बॅंकेतील खात्यात कर्जमुक्तीची रक्कम जमा होईल.
-रमेश कटके, 
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, यवतमाळ.

संपादन - अथर्व महांकाळ