दुर्दैवी! दुष्काळामुळे बळीराजावर लाडक्या ढवळ्या- पवळ्याला विकण्याची वेळ; उदरनिर्वाहासाठी मदतीची प्रतीक्षा

राजकुमार भितकर 
Wednesday, 30 December 2020

कोरोनाच्या संकटामुळे सर्व उद्योगधंदे बंद असताना शेतकरी शेतात राबत होते. या काळातही शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडले नाही. तरीदेखील सर्व काही विसरून शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले.

यवतमाळ : खरीप हंगाम शेतकऱ्यांची परीक्षा बघणारा आणि आर्थिकदृष्ट्या उद्‌ध्वस्त करणारा ठरला आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या कालखंडात शेतमाल मातीमोल भावाने विकण्याची वाईट वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेतकऱ्यांना दुष्काळातील मदतही मिळू शकली नाही. परिणामी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी बैलजोडी बाजारात विक्री करण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा  - आमदारांसाठीही पदवी अनिवार्य करणार का? ग्रामपंचायत निवडणुकीत शिक्षणाच्या अटीचा विरोध करत...

कोरोनाच्या संकटामुळे सर्व उद्योगधंदे बंद असताना शेतकरी शेतात राबत होते. या काळातही शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडले नाही. तरीदेखील सर्व काही विसरून शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले. जिल्ह्यात कपाशीनंतर सोयाबीनला शेतकरी पसंती देतात. मात्र, खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे मारण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली. 

जिल्हाभरातील जवळपास बारा हजार शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे बोगस बियाणे निघाल्याच्या तक्रारी केल्यात. या तक्रारींचा खच कृषी विभाग कार्यालयात पडून आहे. शासनाकडून आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली होती. त्यापैकी काहीच शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर लढणाऱ्या शेतकरी संघटनांसह सामाजिक संघटनांनी बोगस बियाणे आणि दुष्काळी निधीच्या प्रश्‍नाकडे वारंवार लक्ष वेधले. त्यासाठी आंदोलन करण्यात आले. मात्र, शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही. 

Look Back 2020: वर्षभरात तब्बल ९० हत्याकांडांनी हादरली उपराजधानी; अनैतिक संबंधामुळे...

दीर्घ कालावधीनंतर बैलबाजाराला हिरवा कंदिल मिळाला. त्यातही खरेदी करणाऱ्यांपेक्षा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची गर्दी अधिक होत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक अडचण लक्षात घेता व्यापारी कवडीमोल भावाने बैलजोडीची खरेदी करीत आहे. शेतकरीही कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मिळेल त्या भावात पशुधनाची विक्री करीत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers are waiting financial help over heavy rain Latest News