बोंडअळी नुकसानीच्या मागणीसाठी शेतकरीपुत्र चढले टॉवरवर

अनिल दंदी 
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

अकोला : बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचे अनुदान वाटपास दिरंगाई होत असल्याचा आरोप करत अनुदानाच्या व कर्जमाफीच्या तात्काळ मागणीसाठी बाळापूर तालुक्यातील उरळ येथील गोपाल अंबादास पोहरे व गणेश वामन पोहरे या शेतकरीपुत्रांनी आज येथील दुरसंचार निगम लिमिटेडच्या भ्रमणध्वनी मनोऱ्यावर चढून अनोखे आंदोलन केले.

अकोला : बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचे अनुदान वाटपास दिरंगाई होत असल्याचा आरोप करत अनुदानाच्या व कर्जमाफीच्या तात्काळ मागणीसाठी बाळापूर तालुक्यातील उरळ येथील गोपाल अंबादास पोहरे व गणेश वामन पोहरे या शेतकरीपुत्रांनी आज येथील दुरसंचार निगम लिमिटेडच्या भ्रमणध्वनी मनोऱ्यावर चढून अनोखे आंदोलन केले.

तालुक्यातील उरळ परीसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जोपर्यंत बोंडअळीची मदत दिली जात नाही, तोपर्यंत खाली उतरणार नाही. असा पावित्रा सुरुवातीला या शेतकरी पुत्रांनी घेतला होता. मात्र उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे यांनी येत्या पंधरा दिवसांत बोंडअळीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर 
सायंकाळी पाच वाजता हे शेतकरीपुत्र खाली उतरले. उरळ येथील शेतकऱ्यांना अद्यापही बोंडअळी नुकसानीच्या अनुदानाचे वितरण झाले नाही. तसेच कर्जमाफी देखील मिळाली नसल्याने येथील दोन शेतकऱ्यांच्या पुत्रांनी याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज सोमवारी सकाळी अकरा वाजता मोबाईल टॉवरवर चढून आगळे-वेगळे आंदोलन केले. जोपर्यंत जिल्हाधिकारी वा पालकमंत्री आश्वासन देत नाहीत तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाही, आसा ईशारा यावेळी आंदोलकांनी दिला होता. मात्र प्रा.संजय खडसे यांच्या आश्वासनाने सायंकाळी पाच वाजता सदर शेतकरीपुत्र टॉवरवरून खाली उतरले.

प्रशासनाची तारांबळ

दोन युवक मोबाईल टॉवरवर चढले असल्याची माहिती मिळताच पोलिस प्रशासनासह महसूल विभागाची चांगलीच तारांबळ उडाली. 
उरळ पोलिस ठाण्याचे ठाणेदार सतिश पाटील यांनी आपल्या पोलीस ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. उरळ येथील पटवारी यांनी तहसीलदार दिपक पुंडे यांना माहिती दिली. नायब तहसीलदार योगेश कौटकर यांनी सर्वप्रथम घटनास्थळ गाठून त्या शेतकरीपुत्रांना खाली येण्याची विनंती केली. मात्र शेतकरीपुत्र आपल्या निश्चयावर ठाम असल्याने उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे व तहसीलदार हे हजर झाले.

शेतकऱ्यांना 14 कोटी रुपयांचे वितरण

बाळापूर तालुक्यातील कपाशीच्या बाधित क्षेत्रासाठी 21 कोटी 50 लाख 54 हजार 154 रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी पहिला टप्पा 5 कोटी 73 लाख 50 हजार 976 रूपयांचा मिळाला. व दुसरा टप्पा 8 कोटी 60 लाख 11 हजार रुपयांचा मिळाला असून तालुक्यातील 80 गावांना 14 कोटी 33 लाख 61 हजार 976 रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.

वर्णमाले मुळे झुरळ गावाला विलंब 

तालुक्यातील गावांना इंग्रजी वर्णमाला(अल्फाबेट) नुसार बोंडअळीची नुकसान भरपाई दिली आहे. नुकसानभरपाईचे दोन हप्ते तहसील कार्यालयाला प्राप्त झाले होते. त्यानुसार वितरण केले आहे. सदर शेतकरी झुरळ येथील असल्याने इंग्रजी वर्णमालेनुसार हे गाव शेवटी असल्याने अनुदान वाटपास विलंब झाला आहे.

शेतकरीपुत्रांच्या मागण्या

कर्जमाफी व बोंडअळीच्या अनुदाना बरोबरच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे नाव बदलावे, नवीन बोंडअळी साठी निंबोळी अर्काचे मोफत वाटप करावे. यासह ईतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. शासनस्तरावरील मागण्यांसाठी उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

तालुक्यातील 80 गावांना पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात अनुदानाचे वाटप केले आहे. 
तिसऱ्या टप्प्यात उर्वरित गावांतील शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा केली जाईल.

- प्रा.संजय खडसे 
उपविभागिय अधिकारी, बाळापूर

Web Title: Farmers climbing towers demanded for damages