वाघाच्या हल्यात शेतकरी ठार अन्‌ बछड्याचाही गेला जीव!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 मार्च 2020

माणिक नन्नावरे आपल्या शेतात पिकांना पाणी देण्यासाठी सायंकाळी गेले. मात्र ते घरी परतले नाही. त्यामुळे कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेतला. तेव्हा छिन्नविछिन्न अवस्थेत त्यांचा मृतदेह नलेश्‍वर नहर परिसरात आढळून आला.

चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्‍यातील मोहाळी नलेश्वर येथील माणिक जगन नन्नावरे (वय 55 ) यांच्यावर पर्यटन विभागाच्या विश्रामगृहाजवळ पट्टेदार वाघाने हल्ला केला. यात ते जागीच ठार झाले. घटना गुरुवारी रात्री 9 वाजताच्या सुमाराला घडली. या वर्षातील तालुक्‍यातील वाघाच्या हल्यातील मृत्यूची या वर्षीची दुसरी घटना आहे. तसेच गोंडपिंपरी येथीलकोठारी वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या बामणी येथील एका शेतात पट्टेदार वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळून आला. शुक्रवारी (ता. 12) सकाळी हा प्रकार समोर आला. या माहितीनंतर वनविभागात प्रचंड खळबळ माजली होती. वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. गेल्या चार माहिन्यांत या परिसरात अशापद्धतीने तीन वाघांचा जीव गेल्याची माहिती आहे.

माणिक नन्नावरे आपल्या शेतात पिकांना पाणी देण्यासाठी सायंकाळी गेले. मात्र ते घरी परतले नाही. त्यामुळे कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेतला. तेव्हा छिन्नविछिन्न अवस्थेत त्यांचा मृतदेह नलेश्‍वर नहर परिसरात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच शिवणी वनक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी भाऊराव तुपे घटनास्थळी हजर झाले. गावकऱ्यांच्या वनअधिकाऱ्यावरील संतापामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांच्या मध्यस्थीने वातावरण शांत झाले. मृत इसमाच्या पत्नीला 25 हजार रुपये रोख आणि चार लाख 75 हजार रुपयांचा धनादेश तत्काळ देण्यात आला. वनविभागाने घटनास्थळी वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी ट्रॅप कॅमेरे आणि पिंजरे लावले असून गस्त आणखी वाढवली आहे.

सविस्तर वाचा - कोरोनाची कमाल! मास्कनंतर आता संपला सॅनिटायझरचा स्टॉक

गुरुवारी वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला असतानाच कोठारी वनपरिक्षेत्रातील बामनी गावातील पुंडलीक मडावी यांच्या शेतात पट्टेदार वाघाचा साधारण एक वर्षाच बछडा जखमी अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सकाळी साधारण नऊ वाजताच्या सुमारास पुंडलीक मडावी नेहमीप्रमाणे आपल्या शेतात पिकाची पाहणी करण्यासाठी गेले असता वांग्याच्या पिकात वाघाचा बछडा जखमी अवस्थेत पडून असल्याचे दिसले.

त्यांनी घाबरून गावात धूम ठोकली आणि गावकऱ्यांना माहिती दिली. गावातील लोक जमा होऊन वाघाला पाहण्यासाठी गर्दी करीत होते. काही गावकऱ्यांनी जवळ जाऊन बघितले असता वाघाचा बछडा गंभीर जखमी अवस्थेत दिसला. यानंतर गावकऱ्यांनी भ्रमणध्वनीद्वारे वनरक्षक टेकाम यांना माहिती दिली. घटनास्थळी चंद्रपूर वनवृत्तचे मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामा राव, डीएफओ गजेंद्र हिरे, आरएफओ संदीप लंगडे, आरएफओ दिलीप बावणे यांच्यासह अनेक वनकर्मचारी उपस्थित होते.

वरिष्ठ अधिकारी पोहोचेपर्यंत मृत्यू
माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन वाघाच्या बछड्यावर जाळी टाकून संरक्षण दिले आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. वरिष्ठ अधिकारी पोहोचेपर्यंत वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाला होता. यानंतर वनअधिकाऱ्यांनी बछड्याला आपल्या ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी नेले.
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer"s death in tigers attack