सातबारात तलाठ्याने खसरा उतरविलाच नाही; शेतकरी पीककर्जापासून होणार वंचित

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 April 2020

तलाठ्याने सातबारावर रब्बी हंगामातील धानपिकांचा समावेश केला नाही; त्यामुळे धान शासकीय आधारभूत केंद्रावर विक्री करता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे.

गोरेगाव (जि. गोंदिया) : मोहाडी राजस्व मंडळांतर्गत येणाऱ्या तेढा साझा क्रमांक 17 येथे कार्यरत तलाठी मधुकर टेंभुर्णे यांनी शेतकऱ्यांनी कर्ज परतफेड केलेल्या सातबारावर खसरा उतरविला नाही.

दरम्यान, या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज बॅंक देणार नाही. तलाठ्याने सातबारावर रब्बी हंगामातील धानपिकांचा समावेश केला नाही; त्यामुळे धान शासकीय आधारभूत केंद्रावर विक्री करता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे.

कामचुकारपणाचा शेतकऱ्यांना फटका

तलाठ्याने पी. एम. किसान योजनेत पात्र असलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज दाखल केले नाही. त्यामुळे गावातील अनेक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात अनुदान जमा करण्यात आले नाही. वर्ग 2 च्या शेतजमिनी वर्ग 1मध्ये समाविष्ट करण्यात यावे, असे शासनाचे निर्देश असताना ते काम पूर्ण करण्यात आले नाही, अशा अनेक समस्या तेढा तलाठी साझा क्रमांक 17 मध्ये असून, तलाठी मधुकर टेंभुर्णे यांच्या कामचुकारपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

त्यामुळे या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य ज्योती वालदे यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र लिहिले आहे. या समस्यांचे निराकरण करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

जाणून घ्या : शासनाच्या आदेशाला त्यांनी फासला हरताळ; मुख्यालयाला टाळे; ग्रामसेवक छुमंतर

खसरा डिजिटलवर दाखवीत आहे
सातबारा दाखल्यात खसरा उतरविला आहे. परंतु, ऑनलाइन सात बारामध्ये खसरा दाखवीत नाही. तो खसरा डिजिटलवर दाखवीत आहे व उर्वरित खसरा उतरविला जात आहे.
- मधुकर टेंभुर्णे, तलाठी, तेढा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers deprived of crop loans