काय? शेतकऱ्यांवर अनुदानापासून मुकण्याची वेळ

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 December 2019

अतिवृष्टीने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी खचल्या. शेतकऱ्यांकडून आलेल्या अशा तक्रारींची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाला देण्यात आली. यात ग्रामपंचायतीने ठराव घेऊन तहसील कार्यालयात पाठविले.

कारंजा (घाडगे) (जि. वर्धा) : जिल्ह्यात अनेक भागात अतिवृष्टी झाली. यात तालुक्‍यातीलही काही भागाचा समावेश आहे. अतिवृष्टीमुळे खचलेल्या विहिरींचे सर्व्हे करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या संदर्भात तहसीलदारांना विचारणा केल्यानंतरच त्यांचे लक्ष या सर्वेक्षणाच्या पत्राकडे गेले आणि त्यांनी यंत्रणेला कामाला लावल्याचे दिसून आले. अनागोंदी कारभारामुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपासून वंचित राहण्याची वेळ येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

अतिवृष्टीमुळे तालुक्‍यातील हजारो विहिरी पावसामुळे खचल्या आहेत. विहिरीच्या सभोताल कडा खचल्या असल्याने या विहिरीतून साधे ओलीत करणेही कठीण झाले आहे. विहिरींच्या दुरुस्तीला शासन स्तरावरून मंजुरी देण्यात येते. यासाठी महसूल विभाग व कृषी विभागाकडून प्रस्ताव मागविला जातो. मात्र, कारंजा तालुक्‍यात दोन मंडळात अतिवृष्टी झाली आहे. या विभागातील शेतकऱ्यांनी खचलेल्या विहिरीचा अर्ज दाखल केला. काहींना तहसील कार्यालयातून परत पाठविण्यात आले. असे कुठलेही आदेश नसल्याचे म्हणत शेतकऱ्यांना आल्या पावली परत करण्यात आल्याची माहिती काही शेतकऱ्यांनी दिली. काही शेतकऱ्यांनी परस्पर अर्ज घेत नसल्याने पोस्टाद्वारे अर्ज तहसील कार्यालयात पाठविले आहे. याला अनेक महिने लोटले असताना सुद्धा अजूनही खचलेल्या व बुजलेल्या विहिरीचे पंचनामे करण्यात आले नाही. 

सविस्तर वाचा - ४०० फूट खोदली बोलरवेल, तरीही लागले नाही पाणी 

 

ग्रामपंचायतीचे ठराव केले परत

अतिवृष्टीने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी खचल्या. शेतकऱ्यांकडून आलेल्या अशा तक्रारींची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाला देण्यात आली. यात ग्रामपंचायतीने ठराव घेऊन तहसील कार्यालयात पाठविले. मात्र, तहसील कार्यालयाने अनेक ग्रामपंचायतीचे ठराव परत केल्याची माहिती काही ग्रामपंचायतींनी दिली आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पत्राला केराची टोपली

अतिवृष्टीमध्ये खचलेल्या व बुजलेल्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी सर्व्हे करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी आठही तहसील कार्यालयांना दिल्या आहेत. हे पत्र सात ऑगस्ट रोजीच रवाना झाले. या पत्रात सन 2019-20 मध्ये जिल्ह्यात काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतातील विहिरी खचलेल्या, बुजलेल्या आहे. अशा विहिरींची महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेअंतर्गत दुरुस्ती करण्याबाबत उपरोक्त शासन निर्णयानुसार मंजुरी प्रदान करण्यात आल्याचा उल्लेख आहे. असे असताना या पत्राला तहसील कार्यालयाने केराची टोपली दाखवली आहे. 

ठराव तहसील कार्यालयात पाठवणार 
ठाणेगावात अतिवृष्टी झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी खचल्या. तहसील कार्यालयाकडून आतापर्यंत कोणत्याही शेतकऱ्याच्या खचलेल्या विहिरीचे पंचनामे करण्यात आले नाही. त्यामुळे आमसभेत ठराव घेऊन सर्व शेतकऱ्यांच्या विहिरीचे पंचनामे करावे. त्याच्या विहिरींची दुरुस्ती कामे मंजूर करण्यात यावे असा ठराव तहसील कार्यालयात पाठवणार आहे. 
- मीनाक्षी रेवतकर, 
सरपंच, ठाणेगाव

असे का घडले? -  संवेदना मेल्या की काय? अमरावतीत नकोशीला सोडून पलायन 

ठराव केले परत 
ग्रामसभेत 35 शेतकऱ्यांच्या खचलेल्या, बुजलेल्या विहिरींचे नावे आलेत. त्यानुसार आम्ही सर्वांचा ठराव घेऊन तो तहसील कार्यालयात पाठविला. मात्र, ते ठराव परत करण्यात आले. 
- गंगाधर किनकर, 
सरपंच, गवंडी

अजूनही पंचनामा नाही 
विहीर पूर्णपणे खचली आहे. त्याची माहिती ग्रामपंचायतीला दिली आणि अर्ज तहसील कार्यालयात दिले. मात्र, अजूनही विहिरीचा पंचनामा केला नाही. 
- स्वप्नील गोहते, 
शेतकरी, गवंडी

सर्वच अर्जांवर कारवाई 
आलेल्या सर्वच अर्जांवर कारवाई करण्यात आली आहे. तालुक्‍यातील काही मंडळात अतिवृष्टी झाली नाही. 
- सचिन कुमावत, तहसीलदार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers deprived of grants