अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी का फिरकला नाही?

क्रिष्णा लोखंडे
Monday, 28 September 2020

खरीप हंगामातील पहिले पीक मूग व उडीद यावेळी बाजारात विक्रीला येते. बाजार गरम असतो व शेतकऱ्यांच्या खिशात पहिल्या पिकाचे पैसे पडू लागतात. यंदा पाऊस लवकर आला. शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. त्यानंतर उत्पादन बऱ्यापैकी होईल, असा शेतकऱ्यांचा अंदाज मात्र फोल ठरला.

अमरावती : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी व खरेदीदार उभे आहेत. दररोज भाव उघडतात. मात्र, आवकच नाही. पोते भरून माल घेऊन येण्याची वेळ झाली तरी शेतकरी अजूनही बाजार समितीकडे फिरकला नाही. खरिपातील मूग आणि उडीद पिकांचा हंगाम आहे. मात्र, या पिकांची आवकच नाही. 

हेही वाचा - कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?, चक्क कपाशीच्या शेतात घेतले गांजाचे पीक

खरीप हंगामातील पहिले पीक मूग व उडीद यावेळी बाजारात विक्रीला येते. बाजार गरम असतो व शेतकऱ्यांच्या खिशात पहिल्या पिकाचे पैसे पडू लागतात. यंदा पाऊस लवकर आला. शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. त्यानंतर उत्पादन बऱ्यापैकी होईल, असा शेतकऱ्यांचा अंदाज मात्र फोल ठरला. ऑगस्टमधील संततधार पावसाने मूग व उडदाची धूळधान केली. सरासरी घसरली. मुगाचे उत्पादन सरासरी हेक्‍टरी 25 किलोपर्यंत आले. उडदाचीही तीच गत झाली. अमरावती जिल्ह्यात 15 हजार हेक्‍टर क्षेत्रात मूग, तर पाच हजार हेक्‍टर क्षेत्रात उडदाची पेरणी होती. तिची सरासरी आली नाही. पोते भरून शेतकरी बाजार समितीत विक्रीसाठी येण्याची वेळ झाली तरी तो आलाच नाही.

हेही वाचा - 'माय बाप सरकार दिव्यांगांची मस्करी करू नका, पगार तर वेळवेवर द्या'

व्यापारी व खरेदीदारांनी खरेदी-विक्रीसाठी ओटे सजविले. शासनाने परिस्थिती बघून शासकीय खरेदीसाठी तयारी केली. नोंदणी केंद्र सुरू केले. मात्र, दोन्ही दरबारात मूग व उडीद घेऊन शेतकरी फिरकला नाही. गेल्या पंधरा दिवसांपासून अमरावती बाजार समितीत दोन्ही पिकांचे भाव उघडल्या जात आहेत. खरेदी मात्र शून्य आहे. नाही म्हणायला उडदाची थोडीफार आवक झाली. मुगाची प्रतीक्षा मात्र अजूनही कायम आहे. शासकीय नोंदणी सुरू झाली आहे. मात्र, त्याठिकाणी देखील एकाही शेतकऱ्याने नोंदणी केलेली नाही. यंदा दोन्ही पीक मिळणार नाही, अशी स्थिती आहे.

संपादन - भाग्यश्री राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmers does not come yet in APMC for selling grains in amravati