ओलावाच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट; कापसाची हमीपेक्षा कमी भावात खरेदी; शेतकऱ्यांचा संताप 

farmers got less money over cotton seeking FIR against businessmen
farmers got less money over cotton seeking FIR against businessmen

कोरपना (जि. चंद्रपूर) : तालुक्‍यात कापूस, सोयाबीनचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यावर्षी पहिली पेरणी वाया गेल्यानंतर सोयाबीनची दुबार पेरणी कामात आली. कापूस, सोयाबीन दोन्ही पिके चांगली आली. त्यामुळे शेतकरी आनंदात होता. मात्र, परतीच्या पावसाने दोन्ही पिकांचे नुकसान केले. कापसावर लाल बोंडअळीने कहर माजविला. यातून वाचलेली दोन्ही पिके शेतकऱ्यांच्या घरी पोहोचत आहेत. मात्र, शासनाने निर्धारित केलेल्या हमीभावही शेतकऱ्यांना न देता कमी भावात कापसाची खरेदी केली जात आहे. ओलाव्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे. त्यामुळे संबंधित खरेदीदारावर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे

तालुक्‍यात यावर्षी 31 हजार 206 हेक्‍टरवर कापूस, तर 5 हजार 698 हेक्‍टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली. पाऊसही यंदा जवळपास एक हजार मिमी पडला आहे. पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन उगवले नाही. अनेकांनी दुबार पेरणी केली. कापसाचे पीक चांगले येईल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र, सोयाबीन कापणीवर असताना परतीच्या पावसाने कहर माजविला. अनेकांची सोयाबीन खराब झाली. तर, अवकाळी पावसाने कापसावर लाल बोंड अळीने कहर माजविला. डोळ्यादेखत पिकाचे नुकसान होत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी महागड्या औषधी खरेदी करून फवारणी केली. मात्र, काहीच परिणाम झाला नाही.

काही शेतकऱ्यांची कापूस वेचणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे तालुक्‍यातील दहापैकी चार ते पाच जिनिंग केंद्रांवर मागील आठवड्यापासून कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे. शासनाने प्रतिक्विंटल 5 हजार 800 रुपये कापसाला हमीभाव ठरवून दिला आहे. मात्र, जिनिंग केंद्रावर कापूस ओला असल्याचे सांगून 4 हजार 200 ते 4 हजार 500 रुपयांपर्यंत खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. मागील पंधरा दिवसांपासून पाऊस आला नसताना कापूस ओला कसा झाला, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करीत आहेत. मात्र, खरेदीदार दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांची आर्थिक लूट करीत आहेत. त्यामुळे खरेदीदारावर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

कायद्याच्या अमलबजावणीकडे दुर्लक्ष

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी व संरक्षण देण्याच्या दृष्टीने मागीलवर्षी कायदा करण्यात आला. त्यानंतर राज्याच्या पणन विभागाने मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुधारणा केली. केंद्र सरकार व राज्य शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी भावाने शेतमाल खरेदी करणाऱ्याला एक वर्ष कारावास व पन्नास हजार रुपये दंडाची तरतूद या कायद्यात करण्यात आली. कायद्याला मान्यता मिळाली. मात्र, तालुक्‍यात अंमलबजावणी केली जात नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

कॉंग्रेसचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

हमीभावाने कापूस खरेदी न करता ओलाव्याच्या नावावर कमी दरात खरेदी सुरू आहे. यातून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लूट थांबवून हमीभावानुसार खरेदी करण्यात यावी, कमी दरात खरेदी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यावेळी श्‍याम रणदिवे, संभाजी कोवे, उत्तमराव पेचे, मनोहर चन्ने, भाऊराव चव्हाण, रसमलाई शेख, अनिल गोंडे, हितेश चव्हाण, रामचंद्र बलकी, सुधाकर नांदेकर, प्रमोद पायघन, मधुकर धगडी, मारोती भोंगडे उपस्थित होते.

तालुक्‍यात कापूस खरेदी सुरू झाली आहे. मात्र, अनेक केंद्रांवर हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी केली जात आहे. मागील पंधरा दिवसांपासून तालुक्‍यात पाऊस नाही. त्यामुळे कापसात ओलावा राहण्याचा प्रश्‍नच नाही. ओलाव्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू आहे. शेतकऱ्यांची लूट थांबवून खरेदीदारांवर कायदेशीर कारवाई करावी.
- उत्तमराव पेचे,
शेतकरी, परसोडा

सम्पादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com