esakal | कोंब फुटलेल्या सोयाबीनसह अखेर शेतकरी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयात, नुकसानाच्या पंचनाम्याची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

विदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस पडत असल्याने शेतीपिकांना फटका बसत आहे. या पावसामुळे सोंगणीवर आलेल्या सोयाबीनच्या शेंगाना कोंब फुटू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जात आहे. शासनाच्या कृषी विभागामार्फत सोयाबीनची पाहणी करण्यात यावी, यासाठी शेतकऱ्यांनी कोंब फुटलेले सोयाबीन घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली.

कोंब फुटलेल्या सोयाबीनसह अखेर शेतकरी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयात, नुकसानाच्या पंचनाम्याची मागणी

sakal_logo
By
सूरज पाटील

यवतमाळ : सोयाबीनच्या हिरव्या शेंगांना कोंब फुटल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. न्याय मदतीच्या मागणीसाठी कोंब फुटलेले सोयाबीन घेऊन शेतकऱ्यांनी बुधवारी (ता. २३) जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. नैसर्गिक आपत्ती विभागाच्या पथकामार्फत पंचनामा करण्याची मागणी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.

खरीप हंगामात जिल्ह्यात तीन लाख २५ हजार हेक्‍टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली. बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतातील उभ्या सोयाबीन शेंगाला कोंब फुटत आहेत.

जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा

महागाव, उमरखेड, पुसद या तालुक्‍यांसह इतरही ठिकाणी नुकसानाची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे याची पाहणी कृषी विभागामार्फत करण्यात आली. मात्र, केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती विभागाच्या पथकाकडून वस्तुनिष्ठ पाहणी करण्यात यावी, पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणे आवश्‍यक आहे. पीकविमा जिल्ह्यात सरसकट लागू करण्यात यावा, जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी शेतकरी संघटनेचे मनीष जाधव, शैलेश राठोड, अश्‍विन लोणकर, सुनील राठोड, प्रेम राठोड, दीपक पोरजवार, रवी राठोड, युसूफखान अलीयर खान पठाण, निशिकांत राऊत, प्रमोद यादव, अशोक चव्हाण, भीमराव राठोउ, प्रशांत पवार, विनोद राठोड आदी उपस्थित होते.

जाणून घ्या : साथीदाराच्या मदतीने पतीला संपविले, धरणात फेकला मृतदेह

अन्यथा आठ दिवसांत रस्त्यावर

कोविड-१९मुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडले आहेत. सोयाबीनला कोंब फुटत आहेत. कपाशीचे बोंड गळून पडत आहेत. तूर पिवळी पडत आहे. चहुबाजूंनी शेतकरी संकटात सापडले आहेत. निवेदन दिल्यापासून आठ दिवसांत पंचनामा करण्यात यावा, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.(संपादन : दुलिराम रहांगडाले)