शेतकऱ्याची नामी शक्कल : पीक संरक्षणासाठी फिरतो रात्रभर "फोकस' 

रविकांत वरारकर 
शनिवार, 14 डिसेंबर 2019

शेतात मध्यभागी एक बांबू गाढून त्याच्या वरच्या टोकाला कूलरचा पंखा फिरविणारी मोटार लावली. ती मोटार चालविण्यासाठी एक जुनी बॅटरी इलेक्‍ट्रीकवर करून घेतली. त्या मोटारच्या पुढे एक फोकस लावला. हा फोकस शेताच्या तिन्ही बाजूला रात्रभर फिरत असतो.

भद्रावती (जि. चंद्रपूर) : वन्यप्राणी शेतात घालीत असलेल्या हैदोसापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी तालुक्‍यातील मांगली (रै) येथील एका शेतकऱ्याने नामी शक्कल शोधून काढली. त्यांनी शेतातील मध्य भागात विजेचा फिरता दिवा लावून जंगली जनावरांपासून पिकांचे संरक्षण करणे सुरू केले आहे. त्यांच्या या प्रयत्नाला चांगले यशसुद्धा मिळाले आहे. विठ्ठल विधाते असे या शेतकऱ्याचे नाव आहे. 

वन्यप्राण्यांचा शेतात धुडगूस 

विठ्ठल विधाते यांचे शेत जंगलाला लागून आहे. त्यामुळे वन्यप्राणी सतत शेतात धुडगूस घालून पिकांचे नुकसान करीत असे. यामुळे विधाते अतिशय त्रस्त झाले होते. शेतातील पिकांचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण कसे करावे याचा ते सतत विचार करू लागले. त्याचवेळी त्यांच्या डोक्‍यात एक नामी शक्कल आली. 

असा केला प्रयोग 

शेतात मध्यभागी एक बांबू गाढून त्याच्या वरच्या टोकाला कूलरचा पंखा फिरविणारी मोटार लावली. ती मोटार चालविण्यासाठी एक जुनी बॅटरी इलेक्‍ट्रीकवर करून घेतली. त्या मोटारच्या पुढे एक फोकस लावला. हा फोकस शेताच्या तिन्ही बाजूला रात्रभर फिरत असतो. मागच्या बाजूला उभी सळाख बांधली. त्यामुळे लाइट गोल फिरत नाही आणि तार गुंडाळण्याची शक्‍यता राहिली नाही. सोबतच त्याच बॅटरीवर टेपरेकॉर्ड लावला. त्यात वाघ, सिंह, कुत्रा या प्राण्यांचे आवाज रेकॉर्ड करून तो मोठ्‌या आवाजात रात्रभर वाजविला जातो. यामुळे शेतात रात्रभर प्रकाश दूरवर पसरत असतो. हिंस्र श्‍वापदांचे आवाज सुरू असतात. त्यामुळे तृणभक्षक प्राणी शेताकडे भटकत नाहीत. विधाते यांची ही युक्ती यशस्वी झाली आहे. विधाते हे एक प्रयोगशील शेतकरी आहेत. बोंडअळीपासून पिकांना वाचविण्यासाठी विधाते यांनी कडुलिंबाच्या पानांचा वापर करून कीटकनाशक बनविले होते. त्याचाही त्यांना फायदा झाला होता. 

वन्यप्राणी सुरक्षित, शेती संकटात

जिल्ह्यात मानव- वन्यजीव संघर्ष नवा नाही. सोबत जंगली जनावरांकडून शेताचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते. वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे जंगली जनावरे सुरक्षित झाली. मात्र, जंगलालगतची शेती संकटात सापडली आहे. शेतशिवारात रात्रंदिवस वन्यप्राण्यांची भटकंती सुरू असते. त्यामुळे पेरणीपासून पीक हाती येईपर्यंत शेतकऱ्यांना डोळ्यात तेल घालून पिकांचे रक्षण करावे लागते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer's Idea : An Overnight "Focus" for Crop Protection