esakal | कवडीमोल भावात दिली जमीन; तरी पिढी बर्बाद! कुठे गेला लढावू बाणा?
sakal

बोलून बातमी शोधा

कवडीमोल भावात दिली जमीन; तरी पिढी बर्बाद! कुठे गेला लढावू बाणा?

कवडीमोल भावात दिली जमीन; तरी पिढी बर्बाद! कुठे गेला लढावू बाणा?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील चंद्रपूर जिल्ह्याच्या अगदी शेवटच्या टोकावरील तालुका म्हणजे गोंडपिपरी. आदिवासीबहुल मागासलेल्या या तालुक्यात एकही उद्योग नाही. तुटकीफुटकी शेती आणि मिळेल ते काम करून येथील गरीब जनता कशीबशी उदरनिर्वाह करते. गोंडपिपरीच्या आधी येणाऱ्या करंजी मुख्य मार्गावरील गावालगत ३५ एकर जमिनीवर एमआयडीसीला मंजुरी मिळाली. परंतु, शासनाच्या अनास्थेमुळे चाळीस वर्षांपासून येथील भूमिपुत्रांना रोजगाराची प्रतीक्षा आहे. (Farmers-in-Gondpipri-taluka-say-give-employment-otherwise-return-the-lands-nad86)

अल्प दरात शेतजमीन देणाऱ्या शेतकऱ्यांची एक पिढी या एमआयडीसीने बर्बाद केली. करंजीचे भूमिपुत्र विजय वडेट्टीवार यांनी कधीकाळी या मुद्यावर स्वतः गोंडपिपरीत आंदोलन छेडले होते. महाविकासआघाडी सरकारमध्ये आता ते स्वतः मंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. राजुरा विधानसभेत मोडणाऱ्या गोंडपिपरी तालुक्याकडे आमदारांनी दुर्लक्षच केले. रोजगारासाठी संघर्ष करणाऱ्या भूमिपुत्रांच्या व्यथा पाहिल्या की डोळ्यांत पाणी येते. विद्यमान मंत्र्यांनी या समस्यांकडे लक्ष द्यावे.

हेही वाचा: भाजपसाठी धोक्याची घंटा? कोअर कमिटीची तातडीची बैठक

करंजीचे भूमिपुत्र विजय वडेट्टीवार शिवसेनेत असताना त्यावेळी त्यांच्या नेतृत्वात गोंडपिपरी येथे आंदोलन करण्यात आले होते. विविध रखडलेल्या प्रश्नांकडे या आंदोलनातून सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. यात करंजी येथील मंजूर एमआयडीसी सुरू करा, या मागणीचा देखील समावेश होता. आता वडेट्टीवार महाविकास आघाडी सरकारमधील कॉंग्रेसचे मंत्री आहेत. पण, आपल्या गावातील एमआयडीसी सुरू करण्यासंदर्भात ते कमालीचे उदासीन आहेत. त्यांच्या या भूमिकेसंदर्भात एकंदरीत तालुक्यात कमालीची नाराजी आहे.

बांधलेले रस्ते आता भंगार झाले

करंजी एमआयडीसी मंजूर होऊन चाळीस वर्षे लोटली. दरम्यान, मागील चार वर्षांपूर्वी एमआयडीसीमध्ये अंतर्गत मार्ग तयार करण्यात आले. यामुळे आता रोजगाराला सुरुवात होईल, असा आशावाद निर्माण झाला. कोट्यवधी रुपये खर्चून डांबरीकरण करण्यात आले. परंतु यानंतर पुढे काहीच झाले नाही. आज हे रस्ते बकाल अवस्थेत आहेत. शासनाचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले.

हेही वाचा: लहान मुलांनी केला चोराचा पाठलाग; आईचे दागिने वाचविले!

राज्यात अनेक तालुक्यात एमआयडीसीला मंजुरी मिळाली. पण, उद्योजक या ठिकाणी यायला तयार नाहीत. करंजी एमआयडीसीसंदर्भात हीच समस्या आहे. कच्चा माल, पाण्याची सुविधा व संबंधित अनेक बाबींचा अळथळा येत असल्याने हा प्रश्न प्रलंबित आहे. गोंडपिपरी तालुक्याच्या विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध आहोत. येथील बेरोजगारांना रोजगार देण्याच्या संबंधाने प्रयत्नांची पराकाष्टा करू.
- सुभाष धोटे, आमदार राजुरा विधानसभा क्षेत्र
काँग्रेसचा पदाधिकारी व गावचा घटक म्हणून मी सातत्याने करंजीतील एमआयडीसी परिसरात उद्योग उभारणी व्हावी, यासाठी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना निवेदन देऊन चर्चा केली. आमदार सुभाष धोटे यांच्याकडे सतत पाठपुरावा सुरू आहे. कोरोना महामारीमुळे लागलेले निर्बंध, लॉकडाऊनमुळे राज्याची स्थिती बिकट आहे. अशावेळी नवीन उद्योग सुरू करणे कठीण आहे. आगामी काळात उद्योगाला चालना देऊन स्थानिकांना संधी दिली जाईल. बाहेरील आणि स्थानिक उद्योजकांनी उद्योग उभारणीसाठी पुढे यावे. पालकमंत्री विजय वडेट्टीवार नक्कीच हा प्रश्न सोडवतील, अशी अपेक्षा आहे.
- कमलेश निमगडे, जिल्हा सचिव काँग्रेस

(Farmers-in-Gondpipri-taluka-say-give-employment-otherwise-return-the-lands-nad86)

loading image