खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांची पाठ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

शासनातर्फे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हमीभावात शेतमालाची खरेदी करण्यात येते. "एफएक्‍यू' दर्जाचा माल हमीभावात खरेदी केला जातो. त्यापेक्षा कमी दर्जांच्या मालाला कमी किंमत मिळते. त्यामुळे शेतकरी आपला शेतमाल खासगी बाजारात नेत आहेत.

यवतमाळ : जिल्ह्यात अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे, तर दुसरीकडे काही पिकांचे भाव खासगी बाजारात सुधारलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासकीय हमीभाव केंद्रांकडे पाठ फिरविल्याचे चित्र सध्या तरी जिल्ह्यात दिसून येत आहे.

जिल्ह्यात यंदा नऊ लाख हेक्‍टरवर खरीप हंगामांची पेरणी झालेली आहे. त्यात सर्वाधिक कापसाचा पेरा आहे. त्यानंतर सोयाबीन, तूर, ज्वारी आदी पिकांचा समावेश आहे. त्यातील तूर व कापूसवगळता इतर सर्वच पिकांची काढणी झाली आहे. या पिकांना यंदा अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न अर्ध्यांवर आलेले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतित दिसून येत आहेत. कापूस व सोयाबीन या प्रमुख पिकांसोबत उडीद, मुंग या पिकांनाही अवकाळीचा फटका बसला आहे. त्यामुळे हाती आलेल्या मालाला चांगला शेतभाव मिळेल, अशी अपेक्षा होती. काही दिवसांपूर्वी सोयाबीन व कापूस ओला असल्याने भाव पडले होते.

 

त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता. आता काही प्रमाणात भावामध्ये फरक पडला आहे. हमीभाव केंद्रापेक्षा खासगी बाजारात थोडी वाढ दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल हमीभाव केंद्रापेक्षा खासगी बाजाराकडे वळला आहे. जिल्ह्यात विदर्भ मार्केटींग फेडरेशनचे सात व मार्केटींग फेडरेशन पाच अशा 11 केंद्रांवर नोंदणीची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरविली असून, जिल्हाभरात केवळ एक हजार 244 शेतकऱ्यांनीच नोंदणी केली आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनीही केंद्राला "ठेंगा' दाखविल्याचे चित्र दिसून येत आहे. शासनातर्फे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हमीभावात शेतमालाची खरेदी करण्यात येते. "एफएक्‍यू' दर्जाचा माल हमीभावात खरेदी केला जातो. त्यापेक्षा कमी दर्जांच्या मालाला कमी किंमत मिळते. त्यामुळे शेतकरी आपला शेतमाल खासगी बाजारात नेत आहेत.

शेतकऱ्यांना"एसएमएस"ची प्रतीक्षा
शेतकऱ्यांकडून हमीभावाने शेतमाल खरेदी करण्यासाठी 11 ठिकाणी हमीभाव केंद्र उघडले आहेत. मात्र, यंदा शेतकऱ्यांचा कल कमी दिसत आहे. ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली, त्यांनाही "एसएमएस' गेले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी "केंद्राला' हात दाखवीत खासगी बाजाराकडे मोर्चा वळविला आहे.

मार्केटींग फेडरेशन
केंद्र-नोंदणी संख्या

महागाव -11
पांढरकाडा-35
आर्णी-09
नेर-00
पुसद-00

"व्हीसीएमएस'
यवतमाळ-24
उमरखेड-254
राळेगाव-05
कळंब-00
घाटंजी-10
वणी-81
झरी-794 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers' Lessons at Shopping Center