एका शेतकऱ्याचे पैसे दुसऱ्याच्या खात्यात

श्रीधर ढगे
सोमवार, 16 डिसेंबर 2019

भाजप सरकारने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे पैसे अजून अनेक शेतकऱ्यांना मिळालेले नाही. याशिवाय या योजनेचा लाभ  मोजक्याच  शेतकऱ्यांना मिळाला असल्याची खात्रीलायक माहिती आहे. 

खामगाव (जिल्हा बुलडाणा) : शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पंतप्रधान मंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा बुलडाणा जिल्ह्यात फज्जा उडाल्याचे चित्र आहे. एकाचे पैसे दुसऱ्याच्या खात्यात, सदोष नोंदणी, नावातील चुकांमुळे अशा कारणांनी  अनेक शेतकरी वंचित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

भाजप सरकारने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे पैसे अजून अनेक शेतकऱ्यांना मिळालेले नाही. याशिवाय या योजनेचा लाभ  मोजक्याच  शेतकऱ्यांना मिळाला असल्याची खात्रीलायक माहिती आहे. विधानसभा निवडणुकीची आचार संहिता लागू होण्याच्या अगोदर या योजनेतील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणे अपेक्षित होते. मात्र, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आणि शासकीय लालफितीचा कारभार यामध्ये ही रक्कम अद्यापही  अनेक लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. कॉम्‍प्‍युटरमधील युनिकोट प्रणालीच्‍या त्रृटींमुळे प्रदीप या नावातील दीपचे लाईट तर वाघ अडनावाचे टायगर असे भाषांतर झाले आहे, या चूक दुरुस्ती साठी मुदतवाढ देण्यात आली आहे. 12 कोटी शेतकऱ्यांना सन्मान निधी योजनेचा फायदा झाल्याचा दावा सरकार करीत असले तरी, प्रत्यक्षात मात्र असे काही झाले नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांनी संपुर्ण माहिती, बँकेच्या खाते क्रमांक, बँकेचे नाव व शाखा, आधार क्रमांक, वय यासह घोषणापत्र भरून तलाठी कार्यालयाकडे जमा केले. त्यानंतर ऑनलाइन अर्ज केले. आता शेतकरी मदतीची प्रतिक्षा करत आहेत.

हेही वाचा - मेडिकलच्या त्या तीन प्राध्यापकांना अभय कुणाचे?

पैसे दुसऱ्याच्याच खात्यात
मी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पंतप्रधान मंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी अर्ज केला आहे. परंतु खात्‍यामध्ये पैसे जमा झाले का याची माहिती घेतली असता सन्‍मान निधीचे पैसे दुसऱ्याच्‍याच खात्‍यात जमा झाल्‍याचे मला  समजले.
- विनोद हरमकार, शेतकरी पहुरजीरा, ता. शेगाव 

महत्त्वाची बातमी - विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाचे संकेत

अद्याप एकही रुपयाही नाही
निसर्गाच्‍या लहरीपणामुळे दरवर्षी शेतकऱ्याचे होणारे नुकसान पाहता शेतकऱ्यांना सन्‍मानाने जगता यावे यासाठी केंद्र सरकारने महिन्‍याकाठी शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला. त्‍यानुसार प्रत्‍येक अल्‍पभुधारक शेतकऱ्याच्‍या खात्‍यात महिन्‍याकाठी 500 रुपये जमा होणार होते परंतु माझ्या अद्याप एकही रुपया जमा झालेला नाही.
- कल्याणी लक्ष्मण पवार, शेतकरी लोणी,  ता.खामगाव

असे का घडले? - मराठा तरुणांना कर्ज देण्यास बॅँका निरुत्साही
   

सन्मान निधी सन्मानाप्रमाणेच मिळावा
केंद्र सरकारने शेतकरी सन्मान निधी पोटी 2000 रुपये शेतकऱ्यांना देण्याचे ठरविले परंतु तो निधी अनेकांना त्रासदायक ठरू लागला आहे. काही शेतकऱ्यांच्या नावांमध्ये, अकाऊंट नंबर मध्ये घोळ तर काही शेतकऱ्यांचा निधी दुसऱ्यांच्याच खात्यात जमा होत आहे. त्या शेतकऱ्यांचे कोणीही अधिकारी ऐकायला तयार नाहीत तर काहींना उडवा उडवीचे उत्तर दिल्या जात आहे. हा सन्मान निधी असेल तर तो सन्मानाप्रमाणेच मिळायला हवा.
- कैलास फाटे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer's money in another account