esakal | विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाचे संकेत
sakal

बोलून बातमी शोधा

rain.jpeg

गत आठवड्यात केरळ, कर्नाटक भागात निर्माण झालेल्या दोन वादळांमुळे दक्षिण महाराष्ट्रासह विदर्भात ढग दाटले होते. दोन दिवसांपूर्वी अकोला जिल्ह्यासह लगतच्या भागात पावसाने हजेरी सुद्धा लावली. आता पुन्हा ढग दाटून आले असून, प्रामुख्याने विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाचे संकेत हवामान तज्ज्ञांनी दिले आहेत.

विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाचे संकेत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : हवामानातील बदलाचे चक्र यंदा थांबायलाच तयार नसून, महाराष्ट्रासह लगतच्या राज्यांमध्ये सध्या वादळी पावसाचे संकेत हवामान तज्ज्ञांनी दिले आहेत. त्यातही विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे.
यावर्षी ऋतूचक्रात आमुलाग्र बदल होऊन उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळ्याचेही चक्र विस्कळीत झाल्याचे दिसून येत आहे. यंदा समुद्रांमध्ये अनेक वादळांची, सतत निर्मिती झाल्याने देशात वेळोवेळी आर्द्रतेचे प्रमाण वाढून आणि वाऱ्यांच्या दिशा, दाब बदलून पावसाचा जोर अधिक राहाला आहे. तत्पूर्वी उन्हाळ्याचे चटके सुद्धा जुलै-ऑगस्टपर्यंत वैदर्भियांना सोसावे लागले. जूनच्या पहिल्या आठवड्यात येणारा मॉन्सून, यावर्षी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात अकोल्यासह विदर्भात पोहचला आणि ऑक्टोबर अखेरपर्यंत पाऊस लांबला. सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळ्याची अजूनही प्रतीक्षा करावी लागत असून, पाऊस पुन्हा पुन्हा डोके वर काढत आहे. दोन महिन्याच जवळपास चार ते पाच वादळांची समुद्रांमध्ये निर्मिती होऊन, महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढले. गत आठवड्यातही केरळ, कर्नाटक भागात निर्माण झालेल्या दोन वादळांमुळे दक्षिण महाराष्ट्रासह विदर्भात पावसाचे सावट निर्माण झाले होते. दोन दिवसांपूर्वी अकोला जिल्ह्यासह लगतच्या भागात पावसाने हजेरी सुद्धा लावली. आता पुन्हा ढग दाटून आले असून, प्रामुख्याने विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाचे संकेत हवामान तज्ज्ञांनी वर्तविले आहेत.

यामुळे दाटले ढग
उत्तरे कडील राज्यात वाढती थंडी आणि दक्षिण भारतात सध्या गर्मीचे वातावरण आहे. यातून गुजरात ते ओडिसापर्यंत मिश्र स्वरुपात तयार झालेल्या पट्यामूळे महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा, बिहार, पूर्वी मध्यप्रदेश व प्रामुख्याने विदर्भ, मराठवाड्यात वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
- संजय अप्तुरकर, हवामान तज्ज्ञ, नागपूर