धानखरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

संगनमताने शेतकऱ्यांची लूट करण्यात येत असल्याचे दिसून येते. शासकीय नियमानुसार आम्हाला खरेदी करता येत नाही आमच्या मर्जीप्रमाणे खरेदी करायची आहे.आदेशानुसार शेतकऱ्यांनी कामात अडथळा निर्माण केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी धमकीही आधाभूत धान खरेदी केंद्रावर देण्यात येत आहे. 

आमगाव(गोंदिया) : तालुक्‍यातील आधाभूत धानखरेदी केंद्रावर मोठ्‌याप्रमाणात शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा आरोप होत आहे. नियमाप्रामणे मोजमाप होत नसल्यामुळे शेतकरी आता धानविक्रीसाठी खासगी व्यापाऱ्यांकडे वळला आहे. 

तालुक्‍यात शासकीय धान्य खरेदी केंद्र प्रमाणात आहेत. शासकीय नियमाप्रमाणे धान खरेदी केंद्रावर प्रति कट्टा 40 किलो 500 ग्रॅम मोजमाप घेणे आवश्‍यक आहे. मात्र, या नियमाचे उल्लंघन करण्यात येत आहे. प्रतिकट्टा 41 किलो 500 ग्रॅमप्रमाणे खरेदी करीत आहेत. शेतकऱ्यांच्या धानाचे प्रतिकट्टा 1 किलोप्रमाणे खरेदी करून लूट केली जात आहे. यासंदर्भात संबधित अधिकाऱ्याकडे विचारणा केली असता त्यांनी खासगी व्यापाऱ्या धान विकण्याचा सल्ला दिला. त्यामुळे संगनमताने शेतकऱ्यांची लूट करण्यात येत असल्याचे दिसून येते. शासकीय नियमानुसार आम्हाला खरेदी करता येत नाही आमच्या मर्जीप्रमाणे खरेदी करायची आहे.आदेशानुसार शेतकऱ्यांनी कामात अडथळा निर्माण केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी धमकीही आधाभूत धान खरेदी केंद्रावर देण्यात येत आहे. 

 

मुजोरीमुळे शेतकऱ्यांसमोर गंभीर प्रश्‍न

आमगाव तालुका अंतर्गत कट्टीपार येथील धान खरेदी केंद्र महिन्यात फक्त पाच दिवस सुरू असते. उर्वरित दिवस बंद असते. याबाबत शेतकऱ्यांनी विचारणा केली तेव्हा गोडावून नसल्याचे उत्तर मिळाले. सरकारकडून गोडावून भाडे मिळत नसल्यामुळे धान खरेदी करण्यात येत नसल्याचेही खरेदी केंद्रावरून सांगण्यात आले. धान खरेदीकरिता जागा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते. अधिकाऱ्यांच्या मुजोरीमुळे शेतकऱ्यांसमोर गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. सरकार लक्ष देत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. 

हे वाचा— युनिसेक्‍स सलून व स्पा सेंटरमधून ती करायची देहव्यापार

अवकाळी पावसाचा फटका 

धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा हजारो रुपयांचा माल पडून आहे. सरकारकडून धानपोत्यांच्या संरक्षणासाठी कोणतीही उपयायोजना करण्यात आली नाही. त्यामुळे अवकाळी पाऊस आला की, धानाचे नुकसान होते. आतापर्यंत हजारो रुपयांची धान अवकाळी पावसात भिजले आहे. यातून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

मोकाट जनावरेही त्रासदायक 

आधारभूत धान खरेदी केंद्रावर सरंक्षण कुंपन नसल्यामुळे मोकाट जनावरे परिसरात येतात आणि धानाची पोत फोडतात. यातून पोत्यातील धान बाहेर पडत असून त्याचा फटकाही शेतकऱ्यांना बसतो. सरकारचे याकडे दुर्लक्ष आहे. धान ठेवलेल्या परिसरातील सुरक्षा नसल्यामुळे धानाचे मोठे नुकसान होते. कधी-कधी चोरटेही पोती चोरून नेत असल्याचे दिसून आले आहे. 

हे वाचा— एकतर्फी प्रेमातून युवतीला जाळण्याचा प्रयत्न, वाचा आणि डोळ्यांना गंभीर दुखापत, युवती कृत्रिम श्‍वसनयंत्रणेवर 

कारवाईची मागणी 

प्रत्येक तालुक्‍यांमध्ये वेगवेगळ्या खरेदी केंद्रावर नियमांचे उल्लंघन करण्यात येत आहे. मर्जीप्रमाणे अधिकारी धानाची खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. खरेदी केंद्रावर दोन महिन्यापासून धानाचे पोते पडून आहेत. याकडे संबधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers at paddy procurement centers