शेतकऱ्यांच्या धानाला अवघा 1500 रुपये भाव; दिवाळी साजरी करण्यासाठी शेतकरी खासगी व्यापाऱ्यांच्या दारात

farmers sold their cotton at 1500 rupees for celebrating diwali festival
farmers sold their cotton at 1500 rupees for celebrating diwali festival

गोंदिया ः शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांना मंजुरी मिळाली. काटापूजन झाले. मात्र, ऑनलाइन सातबाराच्या नादात धान विक्री होऊ शकली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी दिवाळी साजरी करण्यासाठी खासगी व्यापाऱ्यांना धान विकत असून, त्यांच्याकडून 1450 ते 1500 रुपये इतका भाव मिळत आहे.

यंदाच्या खरीप हंगामात 1 लाख 90 हजार हेक्‍टरवर जिल्ह्यात धानपिकाची लागवड करण्यात आली. कधी ओला तर, कधी कोरड्या दुष्काळाचा सामना या हंगामात शेतकऱ्यांना करावा लागला. तरीही खचून न जाता शेतकऱ्यांनी पीक जगविले. धानपीक ऐन बहरात असताना बहुतांश ठिकाणी मावा, तुडतुडा रोगाने पीक उद्धस्त केले. अशाही परिस्थितीत हातात आलेले धान विकून दिवाळी साजरी करण्याचा मानस शेतकऱ्यांचा होता. 

याच कालावधीत शासनाचे आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू झाले. थाटात काटापूजनही झाले. शेतकऱ्यांनी धान शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर विकावे, असे आवाहन केले गेले. परंतु, ऑनलाइन सातबाराची अट आणि एसआयटी चौकशीच्या फासात खरेदी प्रक्रिया रखडली आहे. या प्रकरणाला विरोध झाल्यानंतर तूर्तास हस्तलिखित सातबाऱ्यावर धान खरेदी सुरू करावी, असे जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार, या सातबाऱ्यावर धान विकल्यानंतरदेखील लक्ष्मीपूजनाच्या दिवसापर्यंत शेतकऱ्यांच्या हाती चुकारे मिळणार नाही. 

या प्रक्रियेला किमान 15 ते 20 दिवसांचा कालावधी लागण्याची चिन्हे आहेत. हेच हेरून शेतकरी दिवाळी सण साजरा करण्यासाठी खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करीत आहेत. खासगी व्यापारी शेतकऱ्यांच्या अगतिकतेचा फायदा घेऊन 1450 ते 1500 रुपये इतका अल्प भाव देत आहेत. यात शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे.

धानाची मळणी होऊन बरेच दिवस लोटले. शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू होतील म्हणून धानाची घरी साठवणूक केली. मात्र, धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांना धान विकण्याची वेळ आली आहे.
- राजेश हरिणखेडे, 
शेतकरी, रा. चारगाव.

ऑनलाइन सातबाराच्या अटीमुळे धान खरेदी प्रक्रिया लांबणीवर गेली. त्यामुळे शासकीय धान खरेदी केंद्रात धान विकता आले नाही. दिवाळीच्या तोंडावर हाती पैसा यावा म्हणून खासगी व्यापाऱ्यांना धान विकावे लागत आहे.
- सुरेश येडे, 
शेतकरी, मुरपार.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com