
विमा कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्यांनी व्यक्त केला रोष, शिवसैनिकांनी शेतकऱ्यांकडून 10-10 रुपयांच्या नोटा जमा करुन त्या नोटा मंडळ प्रबंधकाच्या अंगावर फेकून रोष व्यक्त केला.
अकोला : फळ पीक विम्याच्या दाव्याचा परतावा थकल्याने व काही शेतकऱ्यांच्या परताव्यात तफावत असल्यामुळे यासंबंधी चर्चा करण्यासाठी सोमवारी (ता. 2) गौरक्षण रोडवरील न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात शेतकरी, विमा कंपनी अधिकारी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर नियोजित बैठकीला विमा कंपनीचे पुणे व नगर येथील इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी न पोहचल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पाहायला मिळाला. त्यातच वेळवर बैठक रद्द झाल्याने शेतकऱ्यांच्या सोबत असलेल्या शिवसैनिकांनी शेतकऱ्यांकडून 10-10 रुपयांच्या नोटा जमा करुन त्या नोटा मंडळ प्रबंधकाच्या अंगावर फेकून रोष व्यक्त केला.
अकोट तालुक्यातील पणज, अकोलखेड, अकोली, वाई दिवठाणा, रुईखेड, बोचरा परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2018-19 मध्ये फळ पीक विमा काढला होता. त्यावर्षी केळी पीकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे दाव्याची रक्कम देण्याची मागणी केली होती. त्यासाठी दोन आठवड्यापासून शेतकरी स्थानिक गौरक्षण रोड वरील विमा कंपनीच्या कार्यालयात चकरा मारत होते. मोबदल्यासाठी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत शेतकऱ्यांनी कार्यालयात दोन वेळा ठिय्या आंदोलन सुद्धा केले होते. या प्रकरणी पोलिसांच्या मध्यस्थीनंतर विमा कंपनीचे अधिकारी, शेतकरी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक सोमवारी (ता. 2) गौरक्षण मार्गावरील न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.
बैठकीत होणार चर्चा
विमा कंपनीचे अधिकारी-प्रतिनिधी, अकोट तालुक्यातील शेतकरी, कृषि अधिकाऱ्यांच्या नियोजित संयुक्त बैठकीत पुणे व नगर येथील इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी न पोहचले नाही. अकोला येथील कार्यालयाने या याप्रकरणाशी आमचा काहीच संबंध नसल्याचे शेतकऱ्यांना पत्र दिले. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी 10-10 रुपयांच्या नोटा जमा करुन विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांवर भिरकावल्या. आता याप्रकरणी बुधवारी (ता.4) अकोट येथील कृषि अधिकारी व शेतकऱ्यांची बैठक हाेणार असून, त्यात चर्चा होणार आहे.
विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा
पीक विम्याच्या परताव्यातील तफावत व दाव्याची रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्याच कार्यालयात कोंडून घेतल्याचा प्रकार 15 नोव्हेंबर राेजी घडला होता. कंपनीकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतरच शेतकऱ्यांनी रात्री ८ वाजता आंदोलन मागे घेतले होते. त्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश आले नाही. परिणामी विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टाच करण्यात येत असल्याचा आरोप काही शेतकऱ्यांनी यावेळी लावला.
एजंट सक्रिय असल्याचा दावा
विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी संबंधित गावांत एजंट सक्रिय असल्याचा दावा काही शेतकऱ्यांनी केला आहे. एकाच गटातील एकाच ठिकाणच्या विम्याची वेगवेगळी रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली. यात कोणाला 50 हजार रुपये (प्रती हेक्टर) तर कोणाला 10-12 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात आली. त्यामुळे याविषयी सक्रिय असलेले एजंट काही शेतकऱ्यांना झुकते माप देत असल्याचा आरोप काही शेतकऱ्यांनी गत आठवड्यात आंदोलनादरम्यान केला होता.