शेतकऱ्यांना मॉन्सूनची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

खामगाव : भरु दे यंदा मृगाचं आभाळ, नावाचा तुझ्या येळकोट करीन, 
धन धान्याची भरू दे रास, अंगावर चढू  दे मूठभर मास, नावाचा तूझ्या येळकोट करीन...या ओळीतील भावना व्यक्त करत शेतकरी मॉन्सूनच्या आगमनाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे.

खामगाव : भरु दे यंदा मृगाचं आभाळ, नावाचा तुझ्या येळकोट करीन, 
धन धान्याची भरू दे रास, अंगावर चढू  दे मूठभर मास, नावाचा तूझ्या येळकोट करीन...या ओळीतील भावना व्यक्त करत शेतकरी मॉन्सूनच्या आगमनाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे.

जून महिन्याला प्रारंभ झाला असून, जिल्ह्यात शेतीच्या मशागतीची कामे जवळपास पूर्णत्वास गेली आहे पऱ्हाटीची वेचाई, कचरा पेटविण्याचे कामही आटोपत आले असून, बळीराजाला आता प्रतीक्षा केवळ दमदार पावसाची आहे. जून महिन्यात दमदार पाऊस आला की, खरिपाच्या पेरणीला प्रारंभ होतो. उन्हाळ्याचे चार महिने शेतीची मशागत करून शेत पेरणीसाठी सज्ज केल्या जाते. जिल्ह्यात कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी, सोयाबिन ही पारंपारिक पिके घेण्यासोबतच काही शेतकऱ्यांनी पुरातन पिकांना फाटा देत शेती व्यवसायात बदल करून काही नवीन पिके घेण्याला सुरूवात केली आहे. 

रब्बी हंगाम संपल्यानंतर पुढील खरीप हंगामासाठी शेत मशागत करून सज्ज करण्यात येते. जिल्ह्यात यंदा उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असल्याने शेतमजुरांनी पहाटेच्या सत्रातच शेतीची कामे करणे सुरू केले आहे. पाऊस कधी येईल आणि कधी पेरणी करावी लागेल, याचा नेम नसल्याने शेतकऱ्यानी बियाणे खरेदीसाठी आर्थिक जुळवाजुळव सुरू केली आहे. पाऊस पडताच बियाणे बाजारात शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी होवून बियाण्यांची टंचाई भासत असल्याने अनेकांनी आतापासूनच शेतात कोणत्या जातीचे बियाणे पेरावे, याचा अंदाज घेणे सुरू केला आहे.

बियाणे बाजारात नवनविन कंपन्यांचे बियाणे विक्रीसाठी आले आहेत. ज्यांच्या विहिरींना मुबलक पाणी आहे, अशांनी पारंपरिक पिकांना फाटा देऊन दुसरे उत्पन्न घेणे सुरू केले आहे.  संग्रामपूर, जळगाव जा, मलकापूर, नांदुरा तालुक्यात संत्रा, मोसंबी आणि लिंबूचे उत्पादन घेतले जाते; परंतु झपाट्याने खालावत चाललेल्या पाण्याच्या पातळीमुळे येथील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.त्यामुळेच मान्सूनच्या पावसाचे वेध शेतकऱ्यांना लागले आहेत.

Web Title: farmers waiting for monsoon