फास्टॅगमुळे स्थानिकांची होणार गोची; वाहनचालक व मालकांत संभ्रम कायम,

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

स्थानिक वाहनांना पूर्वीप्रमाणेच कमी टोल द्यावा लागेल का? याचेही उत्तर मिळू शकले नाही. 15 डिसेंबरनंतर मात्र फास्टॅग नसलेल्या वाहनांना दुप्पट टोल द्यावा लागणार आहे. 

नागपूर : महामार्गावरील टोल नाक्‍यावर फास्टॅग प्रणाली अमलात आणण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. 15 डिसेंबर नंतर मात्र "फास्टॅग' नसलेल्या वाहनांना दुप्पट "टोल' भरावा लागू शकतो. दुसरीकडे मात्र या प्रणालीत काही दोष असल्याचे दिसून आले आहे. तर टोल प्लाझानजीकच्या गावकऱ्यांना मिळणाऱ्या पासेसवरही त्याचा परिणाम पडणार का? असाही प्रश्‍न स्थानिकांना पडला आहे. 

अमरावती रोड : गौंडखैरी

धामना (लिंगा) : अमरावती मार्गावरील गौंडखैरी येथील टोल प्लाझाचे व्यवस्थापक प्रेम पांडे यांनी माहिती देताना म्हणाले, आठ लेनपैकी सहा लेन फास्टॅगसाठी राखीव झाल्या आहेत. येथून वाहने थेट येणे-जाणे करीत आहेत. दोन्ही बाजूला असलेली एक-एक अशा दोन लेन रोखी व्यवहारासाठी राखीव आहेत. येथील व्यवस्थापकाशी चर्चा केल्यावर फास्टॅग प्रणालीतील दोष समोर आला. त्यात तीनचाकी प्रवाशी ऑटोला फास्टॅग लागत नसल्याचे सांगण्यात आले. तर तीनचाकी मालवाहू वाहनासाठी टोल आकारला जातो. या तीनचाकी वाहनांसाठी फास्टॅग सुविधा आहे किंवा नाही याची कल्पना टोल प्लाझा व्यवस्थापकांनादेखील नव्हती.

याशिवाय स्थानिकांना याचा मोठा फटका बसणार असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून जाणविले. स्थानिकांना आतापर्यंत पास दिल्या जात होत्या. त्यानुसार कार व इतर चारचाकी वाहनांना दहा रुपये तर मालवाहू वाहनांना 25 रुपये टोल भरावा लागत होता. आता फास्टॅग आल्याने तो किती भरावा लागणार याचेदेखील स्पष्टीकरण ते देऊ शकले नाहीत. यामुळे येथील कर्मचाऱ्यांनादेखील फास्टॅगबद्दल पूर्ण माहिती नसल्याचे समोर आले. फास्टॅग काढण्यासाठी टोल नाक्‍यावर जनजागृती केली जात असून त्यासाठी येथे विविध विभागाचे कर्मचारी मदत करीत असल्याचेही पांडे यांनी सांगितले. 

जबलपूर रोड : खुमारी

रामटेक : जबलपूर मार्गावरील खुमारी येथील "ओरिएंटल टोल प्लाझा'वर फास्टॅग काढण्यासाठी वाहनधारक मदत केंद्रावर नोंदणी करीत होते. येथे आयसीआयसीआय बॅंकेकडून फास्टॅग देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. बॅंकेचे कर्मचारी हितेंद्र उपवंशी, फास्टॅग प्रभारी कृष्णा उपाध्याय, सतीश किरपान यांचेकडे आतापर्यंत 205 वाहनधारकांनी आपली नोंदणी पूर्ण केली आहे. नोंद होताच वाहनधारकांना एक ग्राहक क्रमांक मिळतो.

स्थानिक चारचाकी वाहनांना नोंदणी करताना 685 रुपये भरावे लागतील. त्यापैकी 265 रुपये महिन्याची पास, शंभर रुपये चिपचे आणि उर्वरित रक्कम फास्टॅग खात्यावर जमा होणार आहे. येथील व्यवस्थापक अतुल आदमने हे मिटिंगला गेले असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. येथे स्थानिक वाहनांना पूर्वीप्रमाणेच कमी टोल द्यावा लागेल का? याचेही उत्तर मिळू शकले नाही. 15 डिसेंबरनंतर मात्र फास्टॅग नसलेल्या वाहनांना दुप्पट टोल द्यावा लागणार आहे. 

आदिलाबाद रोड : बोरखेडी

बुटीबोरी : बोरखेडी टोल प्लाझावर नियमित वाहनाधारकांपैकी 35 टक्के फास्टॅग झाले आहेत. दोन्ही बाजूच्या एकूण दहा लेनपैकी दोन लेन आपद्‌कालीन स्थितीसाठी राखीव आहेत. चार फास्टॅगसाठी तर चार लेनवर रोख स्वीकारली जात आहे. फास्टॅग लेनमधून वाहतूक अत्यंत सुरळीत सुरू आहे तर रोख लेनवर गाड्यांच्या रांगा लागल्या दिसून आल्या.

बोरखेडी टोल प्लाझाचे व्यवस्थापक विनेश पोटे यांनी सांगितले की, मुदत वाढवून दिल्यामुळे वाहन चालक व मालकांना नवीन प्रणालीत येण्यासाठी वेळ मिळाला आहे. आम्ही फास्टॅगसाठी कॅम्प लावले आहेत. एसबीआय, एचडीएफसी, ऍक्‍सिस, पीएनबी यासह 19 बॅंकेच्या माध्यमातून तसेच पेटीएमच्या माध्यमातून "फास्टॅग' अकाउंट करता येते. विशेष म्हणजे "फास्टॅग'चा उपयोग करणाऱ्यांना "कॅशबॅक'चा फायदाही मिळणार आहे. याबाबत शंका असल्यास टोल व्यवस्थापकांशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले. 

भंडारा रोड : माथनी

मौदा : भंडारा मार्गावरील माथनी टोल प्लाझावर फास्टॅग प्रणालीत 40 टक्के नोंदणी झाली असल्याचे येथील प्रभारी कर्मचाऱ्यांनी सांगितले. फास्टॅग प्रणालीत सर्वच वाहनांचा समावेश आहे. यामुळे प्रत्येक वाहचालकांना फास्टॅग बंधनकारक होणार आहे. मौदा व माथनीच्या नागरिकांना या टोल प्लाझावर टोल द्यावा लागत नाही. मात्र, त्यांना फास्टॅग प्रणालीचा अवलंब करावाच लागणार आहे.

माथनी मौदा येथील नागरिकांना सूट देण्यासाठी त्यांना टोल प्लाझावर पोहोचण्यापूर्वी फास्टॅगची पट्टी झाकून ठेवावी लागेल. त्यांच्यासाठी वेगळी लेन असेल. इतर टोल प्लाझावर ते पट्टी झाकून जाऊ शकणार नाहीत. तेथे त्यांना पूर्ण टोल द्यावाच लागेल. आम्ही फास्टॅगबद्दलची जनजागृती करीत आहोत. एकूण दहा लेनपैकी चार लेनमधून फास्टॅग सुरू आहे. यामुळे वाहनांची गती वाढली असल्याचेही ते म्हणाले. 

बैतुल रोड : पाटणसावंगी

सावनेर : नागपूर-भोपाल महामार्गावरील पाटणसावंगी टोल प्लाझाचे अवलोकन करताना टोल कर्मचारी फास्टॅकबाबत जनजागृती करीत असल्याचे दिसून आले. येथे ही प्रणाली लागू झाली आहे. मात्र, 15 डिसेंबरपासून ती पूर्णत: राबविण्यात येणार आहे. यातील काही वाहनधारक "नको रे बाबा ही प्रणाली त्यापेक्षा आहे तेच राहू द्या' असेही बोलताना दिसत आहेत. येथून नेहमीच येणे जाणे करणारे सोनू राबसाहेब म्हणाले, फास्टॅग नसलेल्यांना टोल दुप्पट द्यावा लागणार, बॅंकेतही चकरा मारण्याची वेळ येईल.

अप-डाऊन करणाऱ्या वाहनधारकांना एकाचवेळी दोन्ही बाजूचा टोल भरल्यानंतर दिल्या जाणारी सवलत या प्रणालीमुळे येताना व जाताना दोनदा टोल द्यावा लागणार असल्याने मिळणार नाही. यामुळे वाहनधारकांना आर्थिक फटका बसणार आहे. टोल नाक्‍यावरील व्यवस्थापक नरेंद्र पिंपळे यांनी माहिती देताना म्हणाले, येत्या 15 तारखेपासून अंमलबजावणी करणार आहोत. आम्ही जनजागृती करीत आहोत, मात्र वाहनधारक यास विरोध करताना दिसत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fastag due to difficulty of locals