esakal | दुर्दैवी! एका;च आठवड्यात बाप-लेकानं गमावला जीव;आई अजूनही रुग्णालयात

बोलून बातमी शोधा

null

दुर्दैवी! एकाच आठवड्यात बाप-लेकानं गमावला जीव;आई अजूनही रुग्णालयात

sakal_logo
By
दशरथ जाधव

आर्वी (जि. वर्धा) : एका आठवड्यात कोरोनाने येथील बाप-लेकाचा बळी घेतला तर आईसुद्धा उपचार घेत आहे. यापूर्वी मामी व मामाचासुद्धा जीव गेल्याने या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. कोरोना दिवसेंदिवस घातक ठरत असल्यामुळे वेळीच सावध राहण्याची गरज आहे.

हेही वाचा: मध्य रेल्वेचे ११ कोच कोविड रुग्णांसाठी सज्ज; मनपासोबत संयुक्तपणे करणार उपचार

येथील एका मध्यम वर्गीय कुटुंबातील प्रमुखाला कोरोनाची लागण झाली. त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता भरती करण्यात आले. डॉक्‍टरांनी उपचार सुरू केला. कोरोनामुक्त करण्याकरिता शर्थीचे प्रयत्न केले मात्र सफल झाले नाही. आठ दिवसापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. अशातच मुलाला व पत्नीलासुद्धा कोरोनाची लागण झाली. दोघांवरही येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या कोविड केंद्रात उपचार सुरू होते. अशातच मुलाची प्रकृती बिघडली. त्याला पुढील उपचाराकरिता अमरावती येथे रवाना केले. मात्र, मंगळवारी (ता.27) त्याचा सुद्धा मृत्यू झाला. हा आघात सहन होत नाही तोच मामा व मामीचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती पोहोचली.

संपूर्ण परिवारच या आघाताने खचला. या कुटुंबाची अशी वाताहात झाली असली तरी याची माहिती उपचार घेत असलेल्या महिलेपर्यंत पोहोचविण्यात आली नाही. कोरोनाने अशी कठीण परिस्थिती निर्माण केली आहे. यातून सुटका करून घेण्याकरिता वेळीच सावध होणे गरजेचे आहे.

हेही वाचा: नागरिकांनो सावधान! तुमच्या खिशातील नोटा डुप्लिकेट तर नाहीत ना? शंभर, दोनशेंच्या नोटांमध्ये गडबड

पहिल्या लाटेपासूनच आर्वी हॉटस्पॉट

तालुक्‍यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. दररोज सुमारे 50 च्यावर कोरोना बाधित रुग्ण निघत आहे. कुटुंबाच्या कुटुंब कोरोनाने आपल्या विळख्यात ओढली आहे. आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. जिल्ह्यातच नव्हे तर लगतच्या जिल्ह्यातसुद्धा खाटा मिळत नाही. औषधाचाही तुटवडा निर्माण झाला आहे. अशा अवस्थेत नागरिकांना सावध राहण्याची गरज आहे. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाने जारी केलेल्या कोविड नियमावलीचे पालन करणे गरजेचे आहे.

संपादन - अथर्व महांकाळ