esakal | नागरिकांनो सावधान! तुमच्या खिशातील नोटा डुप्लिकेट तर नाहीत ना? शंभर, दोनशेंच्या नोटांमध्ये गडबड

बोलून बातमी शोधा

null
नागरिकांनो सावधान! तुमच्या खिशातील नोटा डुप्लिकेट तर नाहीत ना? शंभर, दोनशेंच्या नोटांमध्ये गडबड
sakal_logo
By
अथर्व महांकाळ

खापरखेडा (जि. नागपूर ) : सावनेर तालुक्यातील खापरखेडा परिसरात बनावट नोटांचे चलन होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. नोटांची लेणदेण करताना नागरिकांनी सावध व जागरूक राहावे, असे आवाहन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघचे राज्य कार्याध्यक्ष शेखर कोलते यांनी केले आहे.

हेही वाचा: नागरिकांच्या सुरक्षतेसाठी ठाणेदार रस्त्यावर; नवदांपत्यांची केली कोरोना चाचणी

शेखर कोलते यांना मंगळवारी दुपारी खापरखेडा परिसराच्या बाजारात एका दुकानदाराला पैसे देतेवेळी दोनशे रुपयांच्या नोटवर शंका आली. यासाठी त्यांनी त्या नोटांचे निरीक्षण केले असता त्यावर उजव्या बाजूला महात्मा गांधी यांचे पांढरे वाटरमार्क नव्हते. नोटवर ‘सेफ्टी लाइन’ ही जाड नसून फक्त हिरव्या रंगाची प्रिंटिंग होती. सोबतच दुसऱ्या दोनशेच्या नोटा व त्या नोटाच्या रंगातसुद्धा थोडा फरक दिसून आला. मागील तीन चार दिवसांपासून बाजारात खरेदी करत असल्याने ती नोट कुणी दिली असेल, याची खात्री कोलते यांना करता आली नाही. त्यामुळे खापरखेडा परिसरात काही असामाजिक तत्व अशा बनावट नोटा बाजारात चालवत असल्याची शंका निर्माण झाली आहे.

सध्या परिसरात लॉकडॉउन असल्याने शासनाच्या आदेशानुसार सकाळी सात ते अकरापर्यंतच बाजार खुला असतो. म्हणून दुकानदार व ग्राहक हे घाईत असतात. याचीच संधी साधून काही असामाजिक तत्व अशा बनावट नोटा बाजारात चालवत आहेत. मोठे चलन असल्याने सर्वच दुकानदार व ग्राहक पाचशेच्या नोटा शक्यतो तपासणी करूनच घेतात. परंतु बाजारात गर्दी व सर्वांनाच घाई असल्याने शंभर व दोनशे रुपयांच्या नोटांकडे मात्र कुणीही लक्ष देत नाही.

हेही वाचा: गावखेड्यात मास्कविनाच जनतेचा वावर; कोरोनाच्या संसर्गाने घेरले; काणाडोळा ठरतोय घातक

नागरिकांची हीच मानसिकता हेरुन त्या असामाजिक तत्वाद्वारे शंभर व दोनशे रूपयांच्या बनावट नोटांवर जास्त भर दिला जात आहे. सोबतच चिकन मटन मार्केट, पेट्रोल पंप, सब्जी मार्केट, हॉस्पिटल व मेडिकल फार्मसी असे गर्दीचे ठिकाण हे त्यांचे मुख्य ‘टार्गेट’असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

संपादन - अथर्व महांकाळ