कौटुंबिक वाद गेला विकोपाला अन् दोन मुलांना पाण्यात बुडवून केली वडिलांनी आत्महत्या 

प्रा. दिनकर गुल्हाने
Tuesday, 11 August 2020

येथून सात किलोमीटर अंतरावरील सांडवा गावचा रहिवासी असलेला लक्ष्मण गणाजी बोके हा सांडवा-फुलवाडी परिसरात असलेल्या माळावरील आपल्या शेतात बांधलेल्या झोपडीत राहत होता.

पुसद (जि. यवतमाळ) : दोन चिमुकल्या मुलांना पाणवठ्यात बुडवून वडिलांनी विषप्राशन करीत आत्महत्या केली. ही घटना तालुक्‍यातील सांडवा-फुलवाडी शिवारात रविवारी (ता. नऊ) दुपारी घडली. 

येथून सात किलोमीटर अंतरावरील सांडवा गावचा रहिवासी असलेला लक्ष्मण गणाजी बोके हा सांडवा-फुलवाडी परिसरात असलेल्या माळावरील आपल्या शेतात बांधलेल्या झोपडीत राहत होता. त्याला वैभव (वय चार) व देवानंद (वय दोन) अशी दोन मुले होती. जवळचे फुलवाडी गाव हे त्याचे सासर होते. रविवारी (ता. ९) सकाळी पत्नीसोबत काही किरकोळ वाद झाल्यानंतर त्याने टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सकाळी दहा वाजता तो दोन्ही मुलांना घेऊन शेताच्या बाजूलाच असलेल्या जंगलातील वनविभागाच्या पाणवठ्यावर गेला. त्याने स्वतः विष प्राशन करून मुलांना पाणवठ्यात ढकलून दिले व स्वतःही उडी घेतली. यात लक्ष्मण बोके आणि मुले वैभव व देवानंद अशा तिघांचाही मृत्यू झाला. दुपारी अडीच वाजता त्यांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. ही बातमी सांडवा गावात पोहोचताच पाणवठ्यावर बघ्यांची गर्दी उसळली.

अवश्य वाचा- पत्नी व मुलाला माहेरी सोडून बहिणीकडे जातो असे सांगितले अन् परतलेच नाही...
 

पुसद ग्रामीण पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर रात्री तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. सोमवारी (ता.दहा) सकाळी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनीता वानोळे यांनी शवविच्छेदन केले. त्यात लक्ष्मणने विष घेतल्याचे आढळून आले. प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे ठाणेदार संजय चौबे तपास करीत आहेत. 

अवश्य वाचा- टिपेश्वरलगतच्या `या` गावांतील नागरिक त्याच्या दहशतीत... कोण आहे तो? 

काही दिवसांपूर्वी मारेगाव तालुक्‍यातील म्हैसदोडका येथील महिलेने आपल्या चिमुकल्या मुलाला कमरेला बांधून जीवनयात्रा संपविली. या घटनेची शाई वाळण्यापूर्वीच ही घटना घडली. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 
संपादन ः राजेंद्र मारोटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A father suicide with two children