Father Threw Small Girl : सात दिवसांपूर्वी चिमुकलीचा जन्म; भेटीसाठी सासरी आलेल्या बापाने दिले फेकून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Father Threw Small Girl News

सात दिवसांपूर्वी चिमुकलीचा जन्म; भेटीसाठी सासरी आलेल्या बापाने दिले फेकून

Father Threw Small Girl News गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : सात दिवसांपूर्वी चिमुकल्या मुलीचा जन्म झाला. मुलगी झाल्याचा आनंद झाल्याने बाप चिमुकलीला भेटण्यासाठी सासरी गेला. मात्र, काही कळायच्या आत चिमुकल्या मुलीला घेऊन पळू लागला. सासरचे कुटुंबीय मागे आल्याचे बघून तो घाबला आणि मुलीला खाली फेकून (Father Threw Small Girl) पळ काढला. यात चिमुकलीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. मात्र, बापाने असे कृत्य का केले हे समजू शकले नाही.

प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील शिर्शी बेरडी येथील रहिवासी कुमोद पौरकार याचे लग्न विठ्ठलवाडा येथील भाग्यश्री देवतळे हिच्याशी झाले होते. त्यांचा आनंदाने संसार सुरू होता. सात दिवसांपूर्वी भाग्यश्रीने गोंडपिपरीच्या ग्रामीण रुग्णालयात चिमुकलीला जन्म दिला.

रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर भाग्यश्री चिमुकलीसह माहेरी विठ्ठलवाडा गावात आली. सात दिवसांनी चिमुकलीचा बाप कुमोद पौरकार हा मुलीला बघण्यासाठी विठ्ठलवाडा येथे आला. त्याने चिमुकलीला घेतले आणि खेळवत होता. दरम्यान, तो चिमुकलीला घेऊन पळू लागला. घरच्यांना काही वेळापर्यंत काहीच समजले नाही.

परंतु, चिमुकली व बाप दिसत नसल्याने शोधाशोध सुरू झाली. काही गावकऱ्यांनी पाठलाग करण्यास सुरुवात केली. सासरची मंडळी मागे लागल्याचे समजताच बापाने चिमुकलीला खाली फेकले (Father Threw Small Girl) व पळ काढला. मात्र, गावकऱ्यांनी बापाला पकडले व ग्रामपंचायत कार्यालयात डांबले.

चिमुकलीला खाली फेकल्याने गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी गोंडपिपरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती नाजूक असल्याची माहिती आहे.

वृत्त लिहीपर्यंत पोलिस घटनास्थळी पोहोचले नव्हते. विठ्ठलवाडा गावात घडलेल्या या घटनेने वातावरण तापले आहे. हा प्रकार नेमक्या कशामुळे घडला हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. दारूच्या नशेत हे कृत्य झाले का हेही स्पष्ट झालेले नाही.

टॅग्स :ChandrapurCrime News