
PM Narendra Modi Birthday : ‘या’ कलाकारांनी साकारली पंतप्रधानांची भूमिका
Bollywood Actors Play Prime Minister Role पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) मे २०१४ पासून पदावर कायम आहे. शनिवार, १७ सप्टेंबर रोजी त्यांचा वाढदिवस... नरेंद्र मोदी हे देशाचे १४ वे पंतप्रधान आहे. त्यांची देशातच नाही तर परदेशातही चर्चा होते. त्यांनी आतापर्यंत अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. त्यातील काही निर्णयांचे देश आणि जनतेने स्वागत केले, तर काही निर्णयांवर प्रचंड विरोध झाला.
चित्रपटसृष्टीनेही देश आणि जगाशी निगडीत प्रत्येक मुद्द्यावर काही ना काही चित्रपट केले आहे. असे अनेक चित्रपट आणि मालिका आहेत जिथे सेलिब्रिटींनी कोणत्या ना कोणत्या पंतप्रधानांची भूमिका साकारली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला अशा सेलिब्रिटींबद्दल (Actors) सांगणार आहोत. ज्यांनी ऑनस्क्रीन पंतप्रधानाची भूमिका साकारली आहे.
विवेक ओबेरॉय
अभिनेता विवेक ओबेरॉयने ‘पीएम नरेंद्र मोदी’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिस आणि समीक्षकांकडून फारशी दाद मिळाली नाही. चित्रपटाचे दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केले होते. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच विवेकचे अनेक लूक सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
अनुपम खेर
संजय बारू यांच्या पुस्तकावर आधारित ‘द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटाची पहिली झलक पाहण्यासाठी लोक खूप उत्सुक होते. मनमोहन सिंग यांचे जीवन या चित्रपटात दाखवण्यात आले होते. अनुपम खेर यांनी स्वत:ला इतक्या उत्तम प्रकारे साचेबद्ध केले होते की त्यांना पाहून प्रत्येकजण गोंधळून गेला होता.
लारा दत्ता
अक्षय कुमारचा चित्रपट बेलबॉटम काही खास कमाल करू शकला नाही. परंतु, लारा दत्ताने चित्रपटात छोटी भूमिका करूनही मन जिंकले. लारा दत्ताने या चित्रपटात इंदिरा गांधींची भूमिका केली होती. सुरुवातीला ती लारा दत्ता असल्याचे कोणीही ओळखले नाही. ही बाब नंतर लोकांसमोर आली तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
रजित कपूर
रजित कपूर अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. कदाचित अनेक प्रेक्षक रजित कपूरला नावाने नव्हे तर पात्रांनी ओळखतात. रजित कपूर यांनी पडद्यावर जवाहरलाल नेहरूंपासून नरेंद्र मोदींपर्यंतची पात्रे साकारली आहेत. ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटात रजित हे पीएम मोदींच्या भूमिकेत दिसले होते. त्याचवेळी त्यांनी ‘गांधी : द कॉन्स्पिरसी’मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांची भूमिका साकारली होती.
रोशन सेठ
अभिनेता रोशन सेठ यांचे नावही या यादीत सामील आहे. गांधी चित्रपटात रोशन सेठ यांनी जवाहरलाल नेहरूंची भूमिका साकारली होती. त्यांनी हे पात्र ज्या पद्धतीने साकारले त्याची आजही अनेकदा चर्चा होते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की आगामी काळातही असे काही चित्रपट प्रदर्शित होत आहेत, ज्यामध्ये वेगवेगळे कलाकार पंतप्रधानाच्या भूमिकेत दिसणार आहे.
इंदिराजींची भूमिका साकारणारे कलाकार
सुचित्रा सेन, सरिता चौधरी, नवनी परिहार, सुप्रिया विनोद, अवंतिका आकेरकर, फ्लोरा जेकब आणि किशोरी शहाणे. कंगना राणावत इमर्जन्सी चित्रपटात इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. तसेच याच चित्रपटात श्रेयस तळपदे अटल बिहारी वाजपेयींच्या भूमिकेत दिसणार आहे.