48 मुलांच्या बापाने मुलांसह केले मतदान 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

लोकसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र वेगात वाहत असतानाच अमरावतीत एक ऐतिहासिक घटनेची नोंद गुरुवारी (ता. 18) झाली. तब्बल 48 मुलांचा बाप आपल्या मुलांसह मतदान करण्यासाठी गेला. शंकरबाबा पापळकर, असे त्या पित्याचे नाव. अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य अंध, अपंग, मतिमंद, बेवारस मुलांच्या वसतिगृहातील ही मुले आहेत.

अमरावती : लोकसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र वेगात वाहत असतानाच अमरावतीत एक ऐतिहासिक घटनेची नोंद गुरुवारी (ता. 18) झाली. तब्बल 48 मुलांचा बाप आपल्या मुलांसह मतदान करण्यासाठी गेला. शंकरबाबा पापळकर, असे त्या पित्याचे नाव. अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य अंध, अपंग, मतिमंद, बेवारस मुलांच्या वसतिगृहातील ही मुले आहेत.

चार दृष्टिहीन, 15 मूकबधीर व दहा पोलिओग्रस्त मुलांचासुद्धा त्यात समावेश आहे. गेल्या 15 ते 20 वर्षांपासून ही मुले या वसतिगृहात राहत आहेत. सर्वांच्या नावापुढे शंकरबाबा पापळकर हेच नाव असल्याने तेच त्यांचे पिता आहेत. रस्त्यावर, कचराकुंडीत, रेल्वेस्टेशन, बसस्थानकावर तसेच अन्य ठिकाणी फेकून दिलेल्या qकवा मातापित्यांनी टाकून दिलेल्या मुलांचा सांभाळ शंकरबाबा पापळकर पित्याप्रमाणे करतात. या मुलांना रोजगार मिळवून देण्यासोबतच त्यांचे लग्न लावून देण्याचे अतिशय आव्हानात्मक कार्य शंकरबाबांनी गेल्या अनेक वर्षांपासून हाती घेतले आहे. आपल्या मुलांना मतदानाचा हक्क मिळावा, यासाठीसुद्धा त्यांनी चांगलाच लढा दिला.

अखेर तब्बल 48 मुलांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क मिळाला. दिव्यांगांसाठी शासनाने या वेळी वाहनांची व्यवस्था केली असली तरी या मुलांनी शासकीय व्यवस्था नाकारून मतदान केंद्रापर्यंत पायी जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे गुरुवारी (ता. 18) सकाळी 11.30 वाजता ही सर्व मुले वसतिगृहातून मतदानकेंद्रावर पायी गेली. त्यात 10 मुले व 38 मुलींचा समावेश आहे. 48 दिव्यांग, निराधार, अनाथ मुलांनी एकाच वेळी मतदान करण्याची देशातील ही पहिलीच घटना असल्याचे मानले जात आहे.

Web Title: a father voted with 48 children