esakal | काचाच्या भिंतीतून बघितला मुलीचा चेहरा; ‘बेबी ऑफ सुकेशनी आगरे’ असे उच्चारले अन् हृदयाचा ठोका चुकला
sakal

बोलून बातमी शोधा

Fathers question to the government is whether our small girl will get back Bhandara hospital fire news

आयसीयूत उपचार घेत असलेल्या चिमुकलीचा चेहरा धर्मपाल याने बाहेरूनच काचाच्या भिंतीतून बघितला. मनोमन सुखावलेल्या धर्मपालने नातेवाईकांना फोन करून बारसे करण्यासाठी निरोप देणे सुरू केले. सर्व काही सुरळीत होते. आता रुग्णालयातून सुटी होणार आणि घरी आनंदसोहळा रंगणार याची सर्वच जण वाट पाहत होते.

काचाच्या भिंतीतून बघितला मुलीचा चेहरा; ‘बेबी ऑफ सुकेशनी आगरे’ असे उच्चारले अन् हृदयाचा ठोका चुकला

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : सरकार आता रुग्णालयाच्या इमारतीचे फायर ऑडिट, अग्निशमन यंत्रणा आणि रुग्णालयातील डॉक्टरांचा हलगर्जीपणा हे सर्व शोधून काढण्यासाठी उठाठेव करीत आहे. चौकशा समिती नेमून कुणाच्यातरी माथी दोष देऊन त्याच्यावर थातूरमातूर कारवाई पण करेल. आता पाच नाही दहा लाखांची मदत करेल. पण हा सर्व आटापीटा केल्यानंतर आमच्या काळजाचा तुकडा परत मिळेल का, असा संतप्त सवाल धर्मपाल आगरे या पित्याने उचलला आहे.

धर्मपाल आगरे हा मेहनती युवक मोहाडी तालुक्यातील उसर्रा या गावातील आहे. तो गावोगावी जाऊन इलेक्ट्रिक फिटिंगजे कामे करून उदरनिर्वाह चालवित होता. दोन भाऊ आणि एका बहिणीची जबाबदारी त्याच्यावर होती. होतकरू असलेल्या धर्मपालला नागपुरातील एका ठेकेदाराकडे महिन्यावारी काम मिळाले होते. धर्मपालचा विवाह लग्न १७ मे २०१९ ला दौनेवाडा गावातील नात्यात असलेल्या सुकेशनीशी झाला. त्याला २९ डिसेंबरला गर्भवती सुकेशनीला भंडारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिला त्याच दिवशी गोंडस मुलगी झाली.

जाणून घ्या -  'तिच्या' घरी सुरु होती लग्नाची लगबग पाहुणेही होते तयार; तेवढ्यात आला फोन अन् एका क्षणात सगळंच संपलं

नागपुरात कामावर असलेला धर्मपाल त्याची सासू सरीता बावणे हिने मुलगी झाल्याची गोड बातमी कानावर घातली. नागपुरात ठेकेदाराकडे कामावर असलेल्या धर्मपालचा बाप झाल्याचा आनंद गगणात मावेनासा झाला. त्याने घाईघाईत हातचे काम सोडले आणि थेट जिल्हा रुग्णालय गाठले. बाळाचे वजन कमी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे तिला आयसीयूत ठेवण्यात आले.

आयसीयूत उपचार घेत असलेल्या चिमुकलीचा चेहरा धर्मपाल याने बाहेरूनच काचाच्या भिंतीतून बघितला. मनोमन सुखावलेल्या धर्मपालने नातेवाईकांना फोन करून बारसे करण्यासाठी निरोप देणे सुरू केले. सर्व काही सुरळीत होते. आता रुग्णालयातून सुटी होणार आणि घरी आनंदसोहळा रंगणार याची सर्वच जण वाट पाहत होते.

चार तासांचा मृत्यूचा थरार
सुकेशनी आणि मी अकराव्या वॉर्डात झोपलेल्या होत्या. अचानक धावपळ आणि आरडाओरड सुरू झाली. रुग्णालयाच्या कोणत्यातरी विभागाला आग लागली. एवढेच प्रत्येक जण सांगत होता. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी प्रसूत महिलांना आणि नातेवाईकांना ताबडतोब मोकळ्या मैदानात जायला सांगितले. त्यामुळे मी सुकेशनीला सांभाळत खाली आणले. ती वारंवार मला मुलीबाबत विचारायला लागली. मलाही माहिती नसल्यामुळे काहीच कळत नव्हते. शेवटी बच्चू ठेवलेल्या विभागाला आग लागल्याचे कळले आणि माझे अवसान गळाले. दहा चिमुकल्यचा मृत्यू झाल्याचे कळताच पायाखालची जमीन सरकली. रात्री दोन ते पहाटे सहा पर्यंताच तो मृत्यूतांडव मी माझ्या डोळ्यासमोर बघितला.
- सरीत बावणे,
प्रसूत माता सुकेशनीची आई

जाणून घ्या - तब्बल १५ वर्षांनी झालं तिसऱ्या पाहुण्याचं आगमन अन् रात्री एका क्षणात कोसळला दुःखाचा डोंगर

...अन् माझ्या हृदयाचा ठोका चुकला
सकाळी सहा वाजता बच्चू ठेवलेल्या वॉर्डातील १७ पैकी १० बाळ दगावल्याचे परिचारीकेने मला सांगितले. त्यामुळे माझी पाचावर धारण होती. मी वारंवार त्या नर्सला माझ्या बाळाबाबत विचारत होती. परंतु, ती मृत बाळांची यादी आल्यावर वाचून दाखवेल, असे उत्तर देत होती. त्यामुळे माझ्या हृदयाची धडधड वाढत होती. डोळे नर्सकडे लागलेले होते. १७ पालक आणि त्यांचे नातेवाईत आम्ही व्हरांड्यात बसलो होतो. अचानक नर्स आली अन् एक-एक नाव वाचायला लागली. मला सर्वच देव आठवायला लागले. माझ्या बाळाचे नाव नको ऐकायला येऊ देऊ, अशी देवाकडे धावा करायला लागले. अशातच ‘बेबी ऑफ सुकेशनी आगरे’ असे नाव उच्चारले. अन् माझ्या हृदयाचा ठोका चुकला. मी मोठ्याने हंबरडा फोडला आणि धाय मोकलून रडायला लागले. वारंवार यादी पुन्हा वाचण्यासाठी तगादा लावायला लागले. मात्र, नियतीला औरच मान्य होते.
- सुकेशनी धर्मपाल आगरे,
मृत बाळाची आई

संपादन - नीलेश डाखोरे

loading image