इंग्रजी माध्यमांच्या निवासी आश्रमशाळेत महिला केअर टेकर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

अमरावती : निवासी इंग्रजी माध्यमांच्या शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी येत्या काळात महिला केअर टेकरची नियुक्ती केल्या जाईल.

अमरावती : निवासी इंग्रजी माध्यमांच्या शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी येत्या काळात महिला केअर टेकरची नियुक्ती केल्या जाईल.
विद्यार्थ्यांच्या विकासासोबतच त्यांच्यात होणारे शारीरिक, मानसिक बदल लक्षात घेऊन त्यांच्याकरिता पोषक वातावरण निर्माण करणे, त्यांच्या गरजा ओळखून त्या पालक, मुख्याध्यापक व शिक्षकांपर्यंत पोहोचविण्याचे काम या महिला केअर टेकर करतील. शिवाय आश्रमशाळांमध्ये नीटनेटकेपणा, स्वच्छता, आरोग्याबाबत घेतली जाणारी काळजी याकडेही लक्ष्य देण्याचा विचार वरिष्ठस्तरावरून काही दिवसांपासून सुरू होता. इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी महिला केअर टेकरची नियुक्ती असेल. हे पद कंत्राटी पद्धतीने भरण्याला आदिवासी विकास विभागाने मान्यता दिली आहे. त्यासाठी त्यांना पंधरा हजार रुपये मानधन मिळेल. बालवाडी, नर्सिंग कोर्स यासारख्या अर्हताप्राप्त महिलांना या पदासाठी प्राधान्य दिले जाईल. प्रकल्प अधिकाऱ्यांच्या स्तरावरून ही नियुक्ती केली जाईल. त्यासाठी प्रकल्प अधिकारी, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी, संबंधित सहायक प्रकल्प अधिकारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांची एक समिती गठित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना त्यांची दिनचर्या ठरवून देण्यापासून तर सुरक्षिततेची काळजी महिला केअर टेकर यांना घ्यावी लागेल. शिवाय या लहान विद्यार्थ्यांचा गृहपाठ घेण्यासोबतच शाळेच्या कामातसुद्धा मदत करणे त्यांना आवश्‍यक असेल. राज्यात इंग्रजी माध्यमाच्या अकरा निवासी आश्रम शाळा असून, त्यात पहिली ते बारावीपर्यंतचे शेकडो विद्यार्थी शिक्षण घेतात.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Female care taker in English media residential school