टीसीसोबत धक्काबुक्की; प्रवासी जखमी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

नागपूर : महिलांसाठी आरक्षित डब्यात चढलेले प्रवासी व टीसीत वाद झाला. धक्काबुक्कीत डोक्‍याला दुखापत होऊन प्रवासी किशोर सिंग (27) रक्तबंबाळ झाला. टीसीने पेन खुपसल्याने प्रवासी जखमी झाल्याचा आरोप अन्य प्रवाशांनी केला. शनिवारी सकाळी नागपूर रेल्वेस्थानकावर घडलेले हे प्रकरण लोहमार्ग पोलिसांपर्यंतही पोहोचले. परंतु, प्रकरण अंगलट येण्याच्या भीतीतून दोन्ही पक्षांनी सामोपचाराने प्रकरण मिटविले.
प्राप्त माहितीनुसार, राखीदरम्यान राजस्थानात रोजगार उपलब्ध होतो. यामुळे हैदराबादचे 10 मजूर अस्थायी कामाच्या शोधात राजस्थानला जाण्यासाठी निघाले. 12861 विशाखापटणम-हजरत निजामुद्दीन एक्‍स्प्रेसमधून ते प्रवास करीत होते. जनरल डब्यात जागा नसल्याने मजुरांनी महिलांच्या डब्यात शिरकाव केला. ही गाडी सकाळी दहाला नागपूर रेल्वेस्थानकावर पोहोचल्यानंतर काही महिला डब्यात चढल्या. त्यांनी जगन नामक टीसीकडे तक्रार केली. टीसीने मजुरांना खाली उतरविण्यासह कारवाईची भाषा केली. यामुळे मजूरही चिडले.
टीसी व मजुरांमध्ये बाचाबाची झाली. प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत पोहोचले. धक्काबुक्कीत किशोर सिंगच्या डोक्‍याला दुखापत होऊन रक्तबंबाळ झाला. धक्कबुक्कीत गाडीचा भाग लागून तो जखमी झाल्याचे टीसीचे म्हणणे आहे. रागाच्या भरात टीसीने पेनाने मारल्याचा आरोप प्रवाशांनी केला. घटनेची सूचना मिळताच लोहमार्ग पोलिसांनी मजूर आणि टीसीला ठाण्यात आणले. त्यानंतर मजुराला तपासणीसाठी मेयो रुग्णालयात नेण्यात आले. प्रकरण शेकण्याची शक्‍यता लक्षात घेता, दोन्ही पक्षांनी सामोपचाराने वाद मिटवीत, तक्रार न करण्याचा निर्णय घेतला. यानंतर मजूर जीटी एक्‍स्प्रेसने रवाना झाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fighting with TC; Traveler injured