fights of hens are increasing in Gadchiroli police ignoring the same
fights of hens are increasing in Gadchiroli police ignoring the same

गडचिरोलीत कोंबडबाजारांना उधाण; लागतात लाखोंच्या पैजा; पोलिसांचे मात्र दुर्लक्ष 

गडचिरोली : कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने लॉकडाउन जाहीर केल्यानंतर बंद पडलेले कोंबडबाजार लॉकडाउन शिथिल होताच नव्या जोमाने सुरू झाले आहेत. कोंबड्यांवर लाखो रुपयांच्या पैजा लावून खेळला जाणारा हा अवैध जुगार बिनबोभाट सुरू असतानाही याकडे पोलिस विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

कुरखेडा तालुक्‍यातील सालईटोला, धानोरा तालुक्‍यातील गुजनवाडी आणि गडचिरोली शहरापासून अवघ्या पाच ते सहा किमी अंतरावर असलेल्या चांदाळा येथेही कोंबडबाजार मोठ्या प्रमाणात भरत आहेत. पूर्वी आरमोरी तालुक्‍यातील कोंबडबाजार अतिशय प्रसिद्ध होता. येथे एक -एक बोली लाखो रुपयांची असायची. पण, मागील काही वर्षांपूर्वी हा कोंबडबाजार बंद पडला. पण, इतर ठिकाणचे कोंबडबाजार भरभराटीत सुरू असून येथे कोंबडेमालक व पैजा लावणाऱ्यांची मोठी गर्दी दिसून येते. 

एकीकडे सरकारने महानायक अमिताभ बच्चन यांच्या आवाजात " दो गज दूर मास्क है जरूरी', "जबतक दवाई नही, तबतक ढिलाई नही' असे ठसक्‍यात सांगत असताना येथे मात्र, प्रचंड गर्दी राहत असून कोरोनाच्या नियमांना हरताळ फासला जातो. जिथे हा कोंबडबाजार भरतो तिथे जत्रेचे स्वरूप आलेले असते. कोंबड्यांना तीक्ष्ण धातूची काती बांधून लढवत असताना मध्ये रिंगण करून ही जीवघेणी झुंज बघायला नागरिकांची मोठी गर्दी जमते.

काही ठिकाणी पोलिसांनी कारवाई केल्यानंतर हे कोंबडबाजार दाट जंगलात भरवले जात होते. पण, मध्यंतरी पुन्हा पोलिस यंत्रणा सुस्त झाल्याचे बघताच कोंबडबाजार भरवणारे निर्धावले असून मोक्‍याच्या ठिकाणीही हा बाजार भरताना दिसतो. जिल्ह्याच्या ग्रामीण भागांत आणि बाराही तालुक्‍यांत कोंबडबाजार भरतात. ही ठिकाणे कोंबड्याच्या झुंजी खेळवणारे, त्यावर पैसे लावून जुगार खेळणारे यांच्यासह सर्वसामान्य नागरिक व पोलिसांनाही माहिती असताना या कोंबडबाजारांवर कारवाई होताना दिसत नाही. याबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

काही ठिकाणी कोंबडबाजाराभोवती अनेक विक्रेते आपली छोटी-मोठी दुकानेही लावतात. याच परिसरात कोंबडबाजारात येणाऱ्यांची वाहनेही मोठ्या संख्येने दिसतात. पण, कारवाईच होत नसल्याने सध्या हे कोंबडबाजार निर्धास्त सुरू आहेत. विशेषत: कुरखेडा येथील सालईटोल्याचा कोंबडबाजार मागील काही दिवसांपासून बहरत आहे. कोरोनाची कोणतीही भीती न बाळगता व नियम न पाळता अनेक नागरिक या बाजारात गर्दी करत आहेत. याशिवाय जिल्ह्यातील इतर कोंबडबाजारांचीही स्थिती अशीच आहे. म्हणून पोलिस विभागाने या कोंबडबाजारांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

हे व्यसन नाही का?

गडचिरोली दारूबंदी झाल्यामुळे अनेक नागरिक दारूच्या व्यसनापासून दूर झाले आहेत. पण, कोंबडबाजाराच्या माध्यमातून अनेकांना जुगाराची सवय लागली आहे. शिवाय जिंकणाऱ्याला पैशांसोबत झुंजीत मेलेला कोंबडाही मिळतो. मग या कातीच्या कोंबड्यासोबत दारूची चव चाखली जाते. इतर कुठल्याही जुगाराप्रमाणेच कोंबडबाजाराचीही अनेकांना सवय लागते. त्यात पैसे गमावणारे उद्‌ध्वस्त होतात. त्यामुळे दारू, तंबाखूसोबत हेसुद्धा व्यसन नाही का, असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com