लॉकडाउनच्या काळात केले उड्डाणपुलाचे उद्‌घाटन; आमदार रवी राणांवर गुन्हा दाखल

Filed a case against MLA Ravi Rana
Filed a case against MLA Ravi Rana

अमरावती : राजापेठ रेल्वे उड्डाणपुलाचे आमदार रवी राणा यांनी युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लॉकडाउनमध्ये उद्‌घाटन केले. या पुलाची अधिकृत चाचणी झालेली नाही. काही किरकोळ कामे अद्यापही सुरूच आहेत. अशातच त्यांनी उद्‌घाटन केल्याने पोलिसांनी आमदार रवी राणा व युवा स्वाभिमान पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

राजापेठ येथील रेल्वेच्या उड्डाणपुलाचा मुद्दा काही वर्षांपासून प्रलंबित आहे. रेल्वेफाटक बंद करण्यात आल्याने राजापेठच्या पलीकडे जाणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. दोन वर्षांपासून नागरिक हा त्रास भोगत आहेत. त्यामुळे या उड्डाणपुलाचे काम तातडीने व्हावे, अशी मागणी वारंवार होत आहे. कामाला गती यावी, यासाठी विविध पातळ्यांवर वारंवार प्रयत्न करण्यात आले.

अशात आमदार रवी राणा यांनी युवा स्वाभिमान पक्षाने आमदारांच्या उपस्थितीत उड्डाणपुलाचे उद्‌घाटन करून गरजू ऑटोचालकांना जीवनावश्‍यक वस्तूंच्या किटचे वाटप केले. या उड्डाणपुलाच्या निर्मितीस केंद्र व राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करून हे काम पूर्णत्वास नेल्याचे समाधान आमदार राणा यांनी व्यक्त केले. 

नागरिकांच्या भावनांचा उद्रेक होऊ नये म्हणून लॉकडाउन काळात उद्‌घाटन करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आयोजित समारंभाला जितू दुधाने, संजय हिंगासपुरे, नितीन बोरकर, जयंत वानखडे, अनुप अग्रवाल, सचिन भेंडे, अजय मोरया, अभिजित देशमुख, अवी काळे यांच्यासह युवा स्वाभिमानचे शेकडो पदाधिकारी उपस्थित होते. 

वाहतुकीसाठी हा पूल खुला होईल 
चाळीस वर्षांपासून रखडलेला व शहराच्या दोन्ही भागाला एकत्रित करण्यासाठी हा पूल आवश्‍यक होता. उड्डाणपुलाचे लोकार्पण आपल्या कारकिर्दीतील सुवर्णक्षण आहे. येत्या आठवड्यात सर्वप्रकारच्या वाहतुकीसाठी हा पूल खुला होईल. 
- रवी राणा, 
आमदार, बडनेरा मतदारसंघ

शेकडोंची गर्दी झाली 
उद्‌घाटनाला परवानगी नव्हती. शिवाय कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव असताना उड्डाणपुलावर धान्य कीट वाटप करताना शेकडोंची गर्दी झाली. त्यामुळे आमदार रवी राणांसह त्यांच्या समर्थकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पूल वाहतुकीसाठी बंद आहे. 
- किशोर सूर्यवंशी, 
पोलिस निरीक्षक, राजापेठ ठाणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com