शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार प्रा. श्रीकांत देशपांडे यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा

संतोष ताकपिरे
Saturday, 21 November 2020

सभेत १०० ते ११० जण उपस्थित होते. त्यामुळे उपविभागीय न्यायदंडाधिकारी रणजीत भोसले यांनी याप्रकरणी सायंकाळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

अमरावती : प्रचारसभेची परवानगी नसतानाही सभा घेतल्याप्रकरणी अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार प्रा. श्रीकांत देशपांडे यांच्याविरुद्ध शुक्रवारी (ता. २०) आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी राजापेठ ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार, उपविभागीय न्यायदंडाधिकारी रणजीत बबन भोसले यांनी याप्रकरणी सायंकाळी तक्रार नोंदविल्यावर प्रा. देशपांडे यांच्यासह इतर काही लोकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला, असे पोलिस निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांनी सांगितले.

सविस्तर वाचा - दुर्दैवी! फराळाचे पदार्थ करताना अचानक घरात पसरला धूर आणि क्षणाधार्त संसाराची झाली राखरांगोळी

दोन दिवसांपूर्वी येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या परिसरात प्रा. देशपांडे यांच्या समर्थनार्थ राज्याच्या उच्चशिक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत प्रचारसभा घेण्यात आली होती. परंतु, सभेच्या आयोजनापूर्वी आचारसंहिता लागू असताना प्रशासनाच्या परवानगीशिवाय सभा घेता येत नाहीत. परंतु, परवानगी नसताना ही सभा घेण्यात आली.

सभेत १०० ते ११० जण उपस्थित होते. त्यामुळे उपविभागीय न्यायदंडाधिकारी रणजीत भोसले यांनी याप्रकरणी सायंकाळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्ष तसेच या निवडणुकीतील उमेदवार संगीता शिंदे यांनी आज या सभेबाबतची तक्रार प्रशासनाकडे केली होती.

अधिक वाचा - स्ट्रगलर असल्याचे भासविले, लग्न करून गंडविले

प्रशासनाकडून अन्य उमेदवारांना प्रचार सभेसाठी परवानगी नाकारली जात असतानाच श्रीकांत देशपांडे यांना मात्र सूट दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. आचारसंहिता भंग करणाऱ्या उमेदवारांवर कारवाई केल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी आग्रही भूमिका संगीता शिंदे यांनी घेतली होती.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Filed a case against Shrikant Deshpande