अखेर गरोदर मातेला तेलंगणा राज्यात प्रवेश...आणि मग घडले असे

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 28 March 2020

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात संचारबंदी लागू केली आहे. मात्र, यातून अतिआवश्‍यक सेवांना वगळले असले; तरी तेलंगणा पोलिसांनी एका गरोदर महिलेला आपल्या राज्यात येण्यास मज्जाव केल्याने "त्या' महिलेवर मोठे संकट कोसळले होते. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नानंतर अखेर तिला रुग्णालयात जाण्याची परवानगी देण्यात आली.

सिरोंचा (जि. गडचिरोली) : सिरोंचा तालुक्‍यातील मंडलापूर येथील सुवर्णरेखा गणेश तुमगिरी (वय 26) या महिलेला गुरुवारी (ता. 26) सकाळी सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्‍टरांनी तपासणी केली असता तिचे बाळंतपण कठीण असल्याने शस्त्रक्रियेची आवश्‍यकता असल्याचे सांगितले. परंतु तिथे शस्त्रक्रियेची सोय नसल्याने तेलंगणा राज्यात नेण्याचा सल्ला दिला.

त्यामुळे सिरोंचापासून जवळ असलेल्या तेलंगणा राज्यात नेणे सोयीचे असल्याने दुपारी अडीच वाजता महिलेला एका रुग्णवाहिकेतून तेलंगणा राज्यातील मंचेरीयल येथे नेत होते.

संचारबंदीचा बसला फटका

राज्याच्या सीमेवर तैनात असलेल्या पोलिसांनी गरोदर महिलेची रुग्णवाहिका अडवली. याबाबतची माहिती सिरोंचा येथील पत्रकारांना मिळाल्यानंतर त्यांनी नाक्‍याकडे धाव घेतली. पोलिसांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, संचारबंदी तसेच कोरोना व्हायरसच्या धोक्‍यामुळे गरोदर मातेला आमच्या राज्यात नेता येणार नाही, असे पोलिसांनी सांगितले.

अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क

इकडे रुग्णवाहिकेत गरोदर माता वेदनेने विव्हळत होती. मात्र, पोलिस ऐकायला तयार नव्हते. यासंदर्भात जिल्हाधिकारी दीपक सिंगला व जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना माहिती देण्यात आली. त्यांनी लागलीच तेलंगणा राज्यातील अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. गरोदर मातेला रुग्णालयात जाऊ द्या, अशी विनंती केली.

हेही वाचा : कर्फ्यूमुळे मिळाली नाही दारू... म्हणून अशी भागवली तलफ.. मग

कुटुंबाला नाहक त्रास

त्यानंतर गृह राज्यमंत्र्याने वरिष्ठस्तरावर चर्चा करून या समस्येची माहिती दिली. अखेर तीन तासांच्या प्रतीक्षेनंतर गरोदर मातेला तेलंगणा राज्यात प्रवेश मिळाला. तेलंगणा राज्यातील पोलिसांच्या हेकेखोरपणामुळे मंडलापूर येथील गरोदर मातेला व तिच्या कुटुंबाला नाहक त्रास सहन करावा लागला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Finally the pregnant mother entered Telangana state