बकऱ्या कोंबड्यांवर चटकलेला बिबट्या अखेर घरात अडकला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

leopard caught

चंद्रपूर :बकऱ्या कोंबड्यांवर चटकलेला बिबट्या अखेर घरात अडकला

सावली : गाव जंगलालगत असल्याने बिबट्या गावात यायचा आणि बकऱ्या कोंबड्यावर ताव मारून जायचा. मागील सहा महिण्यापासून बिबट्याचा हा नित्यक्रम सुरू होता. अखेर त्या बिबट्याला बकऱ्या कोंबड्यावर ताव मारणे महागात पडले आहे. बकऱ्या कोंबड्यावर ताव मारण्यासाठी घरात घुसलेल्या बिबट्याला साखर झोपेत असलेल्या आवारी कुटूंबाने मोठ्या शिताफीने आपल्या सदस्यांचा जिवन वाचवित घरात कोंडून घेतल्याची घटना आज गुरूवारी (7 एप्रिल) ला पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. तब्बल पाच तास घरात कोंडून असलेल्या बिबट्याला साडेआठच्या सुमारास सावली वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंजऱ्यात पकडून ताब्यात घेतले आहे. अंगावर शहारे आणणारी थरारक ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात उसेगाव येथे घडली आहे. ज्यांच्या घरात बिबट घरात अडकला त्या कुटूंबांचे नाव भगवान निंबाजी आवारी असे आहे.

घटनेची हकीकत असी की, सावली तालुक्याचे ठिकाणापासून उसेगावचे 6 किमी अंतर आहे. गावाशेजारी जंगल असल्याने वन्यप्राण्यांचा नेहमीच धोका असतो. या परिसरातील जंगलात वाघ, बिबट्यांचे वास्तव्य आहेच. मागील सहा महिण्यापासून एक बिबट गावात पहाटेच्या सुमारास नेहमी घुसायचा आणि शेळ्या, कोंबड्यांवर ताव मारून निघून जायचा. गावात बिबट वाघ येत असल्याने कुणाचीच हिंमत त्याचा रोखण्यापासून होत नव्हती. त्यामुळे बिबट्याचा हा प्रकार नित्य नियमाने सुरूच होता. अनेक नागरिकांच्या शेळ्या आणि कोंबड्याचा बिबट्याने फडशा पाडला आहे. भगवान निंबाजी आवारी यांचे घर जंगलालगत शेताला लागून आहे. यापूर्वी बिबट्याने दोनदा त्यांच्या घरात घुसून कोंबड्यावर ताव मारला आहे.

बकऱ्या, कोंबड्या या पाळीव प्राण्यांच्या रक्ताची चटक लागल्याने आज गुरूवारी (7 एप्रिल) ला तिसऱ्यांदा भगवान आवारी यांचे घरात पहाटेच्या सुमारास बिबट घुसला. तेव्हा घरात पती, पत्नी व मुले हे साखर झोपेत होते. कुणालाही बिबट घरात घुसल्याची कल्पना नव्हती. मात्र घरात घुसलेला बिबट थेट पत्नी शशिकला यांच्या खाटेखाली लोळला होता. त्यावेळी खाटेखाली काहीतरी असल्याचा भास शशिकलाबाई ला झाला. तिने जागे होवून पाहिले असता खाटेखाली बिबट असल्याचे लक्षात आले. आणि तिची पाचावर धारण बसली. तिने लगेच पतीला जागेकरून हा प्रकार सांगितला. आणि बिबट गुरगुरायला लागला. थेट मृत्यूच पुढे असल्याने अख्खे कुटूंब मृत्यूच्या दाढेत होते. परंतु या प्रसंगाचा पती भगवानने मोठ्या शिताफीने सामना केला. मुलांना जागे करून आणि पत्नीला धरून एक एक सगळेच घरातून बाहेर पडलेत आणि बिबट्याला घरात अडकवून दार बंद करून घेतला. आणि संपूर्ण कुटूंबांनी सुटकेचा श्वास घेतला.

या घटनेची माहिती गावात होताच, एकच कल्लोळ सुरू झाला. आवारी यांचे घराकडे अडकलेल्या बिबट्याला पहाण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली. तब्बल पाच तास घरात बिबट बंदीस्त झाला. नागरिकांनी आवारी यांचे घरासभोवती पहारा देऊन त्याच्यावर नजर ठेवली. त्यानंतर स्थानिक वनकर्मचाऱ्याच्या मदतीने सावली वनविभागाला घरात बिबट अडकल्याची माहिती उपसरपंच सुनील पाल यांनी दिली लगेच जिल्हा परिष्ठ वनाधिकारी खाडे यांचे नेतृत्वात वनपरिक्षेत्राधिकारी कामडी, परिक्षेत्राधिकारी राजू कोडापे, वासुदेव कोडापे, इको प्रोचे बंडू धोतरे, पशुवैद्यकीय अधिकारी कुंदन पोचलवार, आशीष बोरकर तसेच सावली वनपरिक्षेत्राधिकारी यांची चमू,इको प्रो चमू, पोलिस प्रशासन आणि अतिशीघ्र कृतीदल चंद्रपूर यांचा ताफा उसेगावात पोहचला.

तब्बल पाच तासानंतर साडेआठच्या सुमारास घरात बंदीस्त बिबट्याला पिंजऱ्या पकडण्यासाठी रेस्यूरत करण्यात आले. बकऱ्या कोंबड्यावर ताव मारण्याच्या नादात घरात अडकलेल्या बिबट्याला रेस्यूूर यशस्वीकरून वनविभागाने ताब्यात घेतले. त्यानंतर आवारी कुटूंबिय आणि अख्या गाव घटनेच्या या थरारक घटनेतून सुटकेचा श्वास घेतला. बिबट हा 1 वर्ष वयोगटातील असल्याचा अंदाज आहे. वनविभागाने उसेागावात पिंजऱ्या पकडलेल्या बिबट्याला त्यांनतर सावली येथे आणून जंगलात नेण्यात आले आहे. मात्र वृत्त लिहे पर्यंत सोडण्यात आले नाही.

Web Title: Finally Stuck House Leopard Caught Shadow Forest Department Awari Family Saved Lives

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..