अबब, घरात केला डिझेलचा साठा, लागली आग

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

मिनीमातानगर, गल्ली नं. 3 येथे परसराम अगनलाल शाहू हा आपल्या कुटुंबियांसह राहतो. परसराम हा ट्रकचालक म्हणून काम करतो. शनिवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास अचानक घराला आग लागली.

नागपूर : घरात डिझेलचा अवैध साठा केल्याने अचानक आग लागल्याची घटना नागपुरातील मिनीमातानगरात घडली. या आगीत एका चिमुकल्यासह तिघे जण भाजल्या गेले. वेळीच आग आटोक्‍यात आल्याने मोठा अनर्थ टळला. 

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मिनीमातानगर, गल्ली नं. 3 येथे परसराम अगनलाल शाहू हा आपल्या कुटुंबियांसह राहतो. परसराम हा ट्रकचालक म्हणून काम करतो. शनिवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास अचानक घराला आग लागली. त्यावेळी घरात परसरामचा मुलगा मनोज शाहू (32), मुलगी पूजा शाहू (24) आणि शेजारचा मुलगा यश महेश जोशी (5 वर्षे) असे तिघेजण होते. अचानक लागलेली आग घरात पसरली आणि घरातील साहित्याने पेट घेतला.

डिझायर कारचे नुकसान
संपूर्ण घराला आग लागल्याने घरात असलेल्या तिघांनाही बाहेर पडता आले नाही आणि तिघेही गंभीररित्या भाजल्या गेले. अग्निशमन दलाला ही माहिती समजताच तीन बंब घटनास्थळी आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून आग विझविली आणि तिघांनाही बाहेर काढले. उपचारासाठी त्यांना वर्धमाननगर येथील राधाकृष्ण हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले आहे. या आगीत घरगुती साहित्य, सायकल, टीव्ही, घराजवळ असलेल्या दोन दुचाकी आणि डिझायर कारचे नुकसान देखील झाल्याची माहिती आहे. 

साडीने घेतला पेट 
कळमना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परसराम यांच्या घराच्या अंगणात तुळशीचे झाड आहे. घटनेच्या वेळी तुळशीजवळ कुणीतरी दिवा लावला होता. तुळशीच्या झाडाच्या वर कपडे वाळविण्यासाठी तार बांधली होती. त्यावर एक साडी वाळविण्यासाठी टाकली होती. साडीचा पदर दिव्यावर पडून साडीने पेट घेतला आणि आग आणखी भडकल्याचे पोलिसांनी सांगितले. 

साठा अवैध? 
विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परसराम हा चालक असल्याने त्याच्या घरात डिझेलचा अवैध साठा करून ठेवण्यात आला होता. घराला आग लागल्यानंतर डिझेलने पेट घेतला त्यामुळे संपूर्ण घरात आग पसरली आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, पोलिसांनी घरात डिझेलचा साठा असल्याबाबत नकार दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fire at home due to diesel stock