अरे बापरे! रेल्वेच्या या कार्यालयाला लागली आग; महत्त्वाचे दस्तऐवजासोबत हे साहित्य खाक

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 May 2020

येथील रेल्वेच्या सिनिअर सेक्शन इंजिनिअर कार्यालयातून सद्यस्थितीत बंद असलेल्या शकुंतला रेल्वेचा कारभार पाहिला जातो.

मूर्तिजापूर (जि.अकोला) : मूर्तिजापूर-अचलपूर-यवतमाळ दरम्यान चालविल्या जाणाऱ्या शंकुतला रेल्वेचा कारभार चालणाऱ्या सिनिअर सेक्शन इंजिनिअर कार्यालयाला रविवारी (ता.24) मे पहाटे 5.30 वाजताच्या दरम्यान आग लागल्याची घटना समोर आली. 

यात रेल्वे साहित्यासह दस्तऐवज, संगणक, फर्निचर जळून खाक झाल्याची माहिती आहे. येथील रेल्वेच्या सिनिअर सेक्शन इंजिनिअर कार्यालयातून सद्यस्थितीत बंद असलेल्या शकुंतला रेल्वेचा कारभार पाहिला जातो. टिन पत्र्यांनी तयार करण्यात आलेल्या या कार्यालयास पहाटेच्या सुमारास आग लागली. पहाटे लागलेल्या आगीत कार्यालयात असलेले रेल्वे संबंधी संपूर्ण दस्तावेज खाक झाले आहे. 

महत्त्वाची बातमी - COVID19 : कसा होतो कोरोनाच्या स्वॅबचा लॅबपर्यंत प्रवास?; कशी होते बाधित असल्याची खात्री?...वाचा

तर कार्यालयासह कार्यालयीन कामकाजासाठी वापरण्यात येत असलेले दोन संगणक व फर्निचर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने रेल्वे प्रशासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. स्थानिक नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली असली तरी या कार्यालयात महत्त्वाचे दस्तऐवज असल्याने ही आग लावली की, लावण्यात आली याबद्दल शंका व्यक्त करण्यात येत आहे.

खामखेड येथे गोठ्याला आग ; एक लाख रुपयांचे नुकसान
बाळापूर : तालुक्यातील खामखेड येथे गोठ्याला अचानक आग लागल्याने त्यामध्ये कापूस, गहू, कृषी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली असून या आगीत 1 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. हि घटना शनिवारी (ता.23) रोजी पहाटेच्या सुमारास घडली. येथील शेतकरी शंकर देवलाल हागे व त्यांचे कुटुंबीय अंगणात झोपले असताना त्यांच्या गोठ्याला अचानक आग लागली. गोठ्यात गहू, कापूस यांसह शेतीची अवजारे व साहित्य ठेवलेले होते. अचानक पहाटे एक वाजताच्या सुमारास गोठ्यातून आगीचे लोळ येताना दिसले. गाावकऱ्यांनी ही आग आटोक्यात आणली. या आगीत स्पिंकलर सट, ठिबक सिंचनाचे साहित्य, तीन क्विंटल कापूस, चार क्विंटल गहू, फवारणी यंत्र, कुटार असे 1 लाख 5 हजार 300 रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. विशेष म्हणजे शेती उपयोगी अवजारे जळाल्याने खुप मोठे नुकसान झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fire at the office of the Senior Section Engineer of Railways in murtizapur