अमरावतीत झाला दुचाकीस्वार युवकावर गोळीबार, काय असावे कारण?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 मे 2020

तौसिफ खान तवक्कल खान (वय 23, रा. सुफियाननगर) असे हल्ल्यातील जखमी युवकाचे नाव आहे. शुक्रवारी (ता. 22) रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.

अमरावती : वलगाव मार्गावरील एका धार्मिक स्थळाजवळ दुचाकीस्वार युवकावर गोळीबार झाला. या घटनेमुळे पोलिस सतर्क झाले. परंतु गोळीबार करणारा आणि जो त्यात जखमी झाला, त्याच्या बयाणाचे स्वरूप लक्षात घेता, पोलिस यंत्रणादेखील संभ्रमात आहे. 

तौसिफ खान तवक्कल खान (वय 23, रा. सुफियाननगर) असे हल्ल्यातील जखमी युवकाचे नाव आहे. शुक्रवारी (ता. 22) रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. तौसिफ खान हा दुचाकीने वलगाव मार्गाने घराकडे जात असताना, मागून आलेल्या दुचाकीस्वारांपैकी कुणीतरी पायात आधी दगड मारल्याचा भास झाला. घटनेच्या वेळी एक ट्रक तेथून गेल्याने हल्लेखोर कोण हे समजू शकले नाही, असे जखमीने सांगितले. परिसरातील नागरिकांनी जखमी तौसिफ खान याला उपचारासाठी आधी खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे पायामध्ये गोळी असल्याचे डॉक्‍टरने सांगितले. तेथून जखमीस त्याच्या मित्रांनी इर्विन रुग्णालयात दाखल केले.

अवश्य वाचा- वाघिणीच्या हल्ल्यात बेसूरचे दोघे जखमी... बछड्यांसह दबा धरून बसली होती शेतात

घटनास्थळी आणि त्यानंतर इर्विन रुग्णालय परिसरात नागपुरीगेट परिसरातील जखमींच्या नातेवाइकांसह नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिस उपायुक्तांसह नागपुरीगेट, गुन्हेशाखेच्या अधिकाऱ्यांनी इर्विन रुग्णालयात धाव घेतली. गोळीबार करणाऱ्याचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. पोलिसांनी अनोळखी हल्लेखोरांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

जखमीच्या बयाणातून हल्लेखोर व गोळीबार करण्याचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. त्याच्या तक्रारीवरून अनोळखी हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 
अर्जुन ठोसरे, पोलिस निरीक्षक नागपुरीगेट ठाणे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Firing on youth in Amravati, A youth injured