esakal | Video : जिद्दीला सलाम, ही ठरली आदिवासी माडीया समाजातील पहिली महिला डॉक्‍टर 
sakal

बोलून बातमी शोधा

komal madavi

. कोमल श्‍यामला कासा मडावी हिने या घनदाट रानात आरोग्यसुविधेअभावी अनेक यातना सहन करणारे नागरिक बालपणापासूनच पाहिले. म्हणून तिने डॉक्‍टर होऊन या लोकांची सेवा करण्याचा निर्धार केला. कोमलचे चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण झिंगानूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. पुढील शिक्षणासाठी सिरोंचा येथील धर्मराव विद्यालयात प्रवेश केला. अनेक अडचणींचा सामना करत उत्तम गुणांनी बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली आणि तिची एमबीबीएससाठी यवतमाळ जिल्ह्यातील वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात निवड झाली. 

Video : जिद्दीला सलाम, ही ठरली आदिवासी माडीया समाजातील पहिली महिला डॉक्‍टर 

sakal_logo
By
तिरुपती चिट्याला

सिरोंचा (जि. गडचिरोली) : आदिवासी जमातींमध्ये अतिशय मागास समजल्या जाणाऱ्या माडीया जमातीतील फारच थोडी मुले महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत पोहोचू शकतात. मात्र, याच जमातीत जन्मलेली आणि झिंगानूरसारख्या अतिदुर्गम गावात राहणारी कोमल मडावी ही तरुणी मेहनत आणि जिद्दीच्या बळावर एमबीबीएसचा अभ्यासक्रम पूर्ण करून आदिवासी माडीया जमातीमधील पहिली महिला डॉक्‍टर ठरली आहे. 

संपूर्ण राज्यात गडचिरोली जिल्हा मागासलेला समजला जातो. पण, इथे बौद्धिकक्षेत्रात शिखर गाठणारे आणि क्रीडाक्षेत्रात आपला नावलौकिक मिळविणारे कमी नाहीत. जिथे वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण या मूलभूत सुविधांचा अभाव आहे, अशा भागात जन्म घेतलेल्या डॉ. कोमल श्‍यामला कासा मडावी हिने या घनदाट रानात आरोग्यसुविधेअभावी अनेक यातना सहन करणारे नागरिक बालपणापासूनच पाहिले. म्हणून तिने डॉक्‍टर होऊन या लोकांची सेवा करण्याचा निर्धार केला. कोमलचे चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण झिंगानूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. पुढील शिक्षणासाठी सिरोंचा येथील धर्मराव विद्यालयात प्रवेश केला. अनेक अडचणींचा सामना करत उत्तम गुणांनी बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली आणि तिची एमबीबीएससाठी यवतमाळ जिल्ह्यातील वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात निवड झाली. 

जिद्दीने पूर्ण केले एमबीबीएस 
या महाविद्यालयातून तिने एमबीबीएसची अंतिम वर्षाची परीक्षा चांगल्या गुणांना उत्तीर्ण करत डॉक्‍टर पदवी प्राप्त केली. मनात जिद्द असली, तर काहीही शक्‍य होऊ शकते, हे कोमलने दाखवून दिले. तिने आपल्या यशाचे श्रेय तिचे आईबाबा तसेच शिक्षणात मदत व मार्गदर्शन करणारे झिंगानूर जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, सिरोंचातील धर्मराव विद्यालयाचे शिक्षक, वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक व वर्गमित्र, मैत्रिणींना दिले आहे. कोमलची आई श्‍यामला आरोग्यसेविका आहेत, तर वडील कासा हे शेतकरी आहेत. आपल्या मुलीने इथेच न थांबता पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण (एमडी) पूर्ण करावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. आपल्याला एम. एस. (सर्जन) व्हायचे असून, त्यानंतर गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात आपल्या आदिवासी बांधवांची सेवा करायची आहे, अशी इच्छा डॉ. कोमल मडावी हिने "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. 

कुख्यात गुंडाच्या हत्येने हादरले तुमसर, व्यापाऱ्यांकडून करायचा हप्तावसुली
 

बहीणही होणार डॉक्‍टर 
डॉ. कोमल मडावीची बहीण पायल कासा मडावी हीसुद्धा अतिशय बुद्धिमान असून सध्या नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. म्हणजे अवघ्या दोन वर्षांनी ती आपल्या बहिणीसारखीच डॉक्‍टर होणार आहे. कदाचित ती आदिवासी माडिया जमातीची दुसरी महिला डॉक्‍टर असेल. 

शहरी नक्षलवादाबद्दल गृहमंत्र्यांनी केले हे महत्त्वाचे वक्तव्य...
 

पहिले डॉ. कन्ना मडावी 
कर्मयोगी बाबा आमटे यांच्या आनंदवन व लोकबिरादरी प्रकल्पातून शिकून पुढे वैद्यकीय पदवी प्राप्त करणारे डॉ. कन्ना मडावी हे माडीया जमातीचे पहिले डॉक्‍टर आहेत. वैद्यकीय क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रातही त्यांचा नावलौकिक आहे. सध्या अहेरी येथे त्यांचे रुग्णालय असून आदिवासी बांधवांच्या आरोग्यसेवेत ते मग्न असतात. आता कोमल पहिली महिला डॉक्‍टर झाल्याने तिच्याकडेही समाज कौतुकाने व आशेने बघत आहे.