रंगीत कापसाची पहिली वर्दी ‘खाकी’ला!

अनुप ताले
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

  • डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा रंगीत कापूस उत्पादनाचा पहिला प्रयोग
  • विद्यापीठाच्या वणी रंभापूर येथील प्रक्षेत्रावर ‘वैदेही 95’ वाणाची पेरणी
  • पहिल्याच वर्षी 15 एकरावर यशस्वी प्रयोग
  •  केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था मुंबई करेल कापड निर्मिती

अकोला : ‘ससा रे ससा दिसतो कसा, कापूस पिंजून ठेवलाय जसा’, या बाल कथेतील काव्यपंक्तींमध्ये आता बदल करण्याची वेळ आली आहे. कारण आता कापूस केवळ पांढरा राहला नाही तर, रंगीत कापूस उत्पादनाचे स्वप्न कृषी शास्त्रज्ञांनी प्रत्यक्षात उतरविले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वणी रंभापूर, अकोला प्रक्षेत्रावर खाकी कापूस उत्पादनाचा हा पहिलाच प्रयोग करण्यात आला असून, तो यशस्वी करून दाखविला आहे.

शुद्ध पांढऱ्या रंगासाठी ‘कापसा सारखा पांढरा’, असा शब्द प्रयोग सहजतेने केला जातो आणि याच पांढऱ्या रंगाच्या कापसावर कृत्रिमरित्या डाय करून रंगीत वस्त्रे निर्मिती होते. कालांतराने कृत्रिमरित्या रंगविलेल्या कापडाचा रंग हळूहळू निघून जातो व काहींना तर अशा कापडांपासून ॲलर्जीसुद्धा होते आणि अशी कापड वापरातून बाद होतात. मात्र आनंदाची बाब म्हणजे आता नैसर्गिकरित्या तपकिरी रंगाच्या कापसाची कापडच उपलब्ध होणार असून, कालांतराने नैसर्गिकरित्या विविध रंगांच्या कापसाची बहुरंगी कापडसुद्धा बाजारात येऊ शकतील. त्यासाठी रंगीत कापूस बियाणे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर यांनी स्वीकारली असून, पूर्णपणे सुरक्षित ठिकाणी मोठ्या प्रमाणात रंगीत कापूस उत्पादीत करण्याची जबाबदारी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी घेतली आहे तर, या रंगीत कापसापासून कापड निर्माण करून त्याची विक्री करण्याची जबाबदारी केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था मुंबई यांनी उचलली आहे. 

जुलै 2019 मध्ये झाला तिहेरी स्वरुपाचा करार
संशोधनात्मक कार्य करणाऱ्या संस्थांनी एकत्र येऊन विकासात्मक कार्य करावे, या तत्वाने नैसर्गिकरीत्या रंगीत कापड निर्मिती व विक्रीसाठी तिहेरी स्वरूपाचा सामंजस्य करार जुलै 2019 मध्ये मुंबई येथील केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेत झाला होता. त्यानुसार डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने या खाकी व सेंद्रीय कापूस वाणाची वणी रंभापूर प्रक्षेत्रावर पेरणी करून पहिल्या वेचातील उत्पादन काढले आहे.

पुढच्या वर्षी १०० एकरावर रंगीत कापूस
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर व केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था मुंबई यांच्या संयुक्तपणे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. उपक्रमांतर्गत यावर्षी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर जवळपास 15 एकरावर या कापूस वाणाची पेरणी केली. त्यातून जवळपास 50 क्विंटल उत्पादन निघण्याची अपेक्षा आहे. निघणाऱ्या सरकीचे बियाणे करून पुढील वर्षी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरच 100 एकरावर या सेंद्रीय व रंगीत कापूस वाणाचे उत्पादन घेण्याचा आमचा प्रयत्न राहील.
- डॉ.विलास भाले, कुलगुरू डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला

सीडकॉट करेल रंगीत कापड निर्मिती
या उपक्रमांतर्गत डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या 15 एकर प्रक्षेत्रावर ‘वैदेही 95’ या नागपुरच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या तपकिरी रंगाच्या कापूस वाणाची यावर्षी पेरणी केली होती. उत्पादित कापूस आयसीआर सीडकॉट, मुंबई यांना पुरविण्यात येणार आहे. तेथे यावर प्रक्रिया करून नैसर्गिकरित्या रंगीत कापड निर्मिती केली जाईल आणि ते बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.
- डॉ.डी.टी. देशमुख, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ कापूस, डॉ.पंदेकृवि अकोला 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first production of colored cotton will be khaki garment