आचारसंहितेच्या कालावधीत प्रथमच कपात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

नागपूर - महापालिका निवडणुकीसाठी प्रथमच आचारसंहितेच्या कालावधीमध्ये घट करण्यात येणार आहे. केवळ 30 ते 40 दिवसांत निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्याचा संकल्प निवडणूक आयोगाने केल्याचे समजते. त्यामुळे अंतिम पुरवणी मतदारयादी येण्यापूर्वीच प्रभागनिहाय मतदारयादी तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

नागपूर - महापालिका निवडणुकीसाठी प्रथमच आचारसंहितेच्या कालावधीमध्ये घट करण्यात येणार आहे. केवळ 30 ते 40 दिवसांत निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्याचा संकल्प निवडणूक आयोगाने केल्याचे समजते. त्यामुळे अंतिम पुरवणी मतदारयादी येण्यापूर्वीच प्रभागनिहाय मतदारयादी तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

महापालिका निवडणुकीसाठी या आठवड्याच्या शेवटी आचारसंहिता लागणार असल्याची अधिकारी वर्गात चर्चा आहे. आतापर्यंत निवडणूक आचारसंहिता 45 दिवसांची होती. नवनवे प्रयोग करणाऱ्या निवडणूक आयोगाने यंदा आचारसंहितेच्या कालावधीत घट करण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्राने स्पष्ट केले. विकासकामे प्रभावित होऊ नये, या हेतूने हा निर्णय घेतला असावा, असा निष्कर्ष आता काढला जात आहे.

आचारसंहितेच्या कालावधीत घट केल्याने संपूर्ण प्रक्रियेसाठी कमी वेळ मिळणार आहे. त्यामुळे महापालिकेने सध्या जुन्या 20 लाख मतदारांच्या संख्येवरून प्रभागनिहाय मतदारयादी तयार करण्याचे काम सुरू केले आहे. 5 जानेवारी रोजी अंतिम पुरवणी मतदारयादी येणार असून, 12 जानेवारीला प्रभागनिहाय यादी तयार करून त्यावर 17 जानेवारीपर्यंत आक्षेप, हरकती मागविण्यात येणार आहे. सध्या तयार करण्यात येत असलेल्या प्रभागनिहाय मतदारयादीमध्ये अंतिम पुरवणी मतदारांचा प्रभागानुसार समावेश करण्यात येणार आहे.

14 हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ताफा
महापालिका निवडणुकीसाठी यंदा मतदान केंद्राची संख्या 1800 वरून 2800 पर्यंत वाढणार आहे. एका मतदान केंद्रावर 5 अधिकारी, कर्मचारी राहतील. अशाप्रकारे निवडणुकीत 14 हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ताफा राहणार आहे.

निवडणूक अधिकाऱ्यांची मागणी नोंदवली
निवडणूक यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. महापालिकेने 13 निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून 13 उपजिल्हाधिकाऱ्यांची मागणी निवडणूक आयोगाकडे नोंदविली. याशिवाय 12 तहसीलदार सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपलब्ध करून देण्याचीही नोंद केली.

Web Title: For the first time the Code of reduction period