बापरे! २५ वर्षात पहिल्यांदाच निवडणूक, मग आतापर्यंत कशी व्हायची संरपंचाची निवड?

first time grampanchayat election in nimkund of achalpur
first time grampanchayat election in nimkund of achalpur

अचलपूर : अचलपूर तालुक्‍यातील निमकुंड ग्रामपंचायतची 25 वर्षांपासून बिनविरोध असलेली निवडणुकीची परंपरा 2021 मध्ये खंडित झाली आहे. विशेष म्हणजे स्थापनेपासून या गावात निवडणूक पहिल्यांदा होत आहे, तीही केवळ एका जागेसाठी. या ग्रामपंचायतच्या निवडणुकीकडे अचलपूर तालुक्‍यातील सर्वांचे लक्ष लागून होते.

अचलपूर तालुक्‍यातील निमकुंड ग्रामपंचायत येथे मागील 25 वर्षांपासून निवडणुकीत मतदान न घेता आदिवासी बांधव सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांची निवड करीत होते. ही ग्रामपंचायत जिल्ह्यात आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळखली जात होती. निमकुंड हे गाव मेळघाटच्या पायथ्याशी वसलेले 1688 लोकसंख्येचे आदिवासी गाव आहे. याठिकाणचे नागरिक शेती आणि मजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकतात. या गावात जिल्हापरिषदेची इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत शाळा आहे, तर समाजकल्याणची दहावीपर्यंत शाळा आहे. त्याच बरोबर आश्रमशाळासुद्धा आहे. गावात मूलभूत सुविधांमध्ये  पिण्याच्या पाण्यासाठी दोन विहिरी, एक बोअर, विद्युत पथदिवे, गल्लीबोळांत रस्ते, नाल्या, जलयुक्त शिवाराची मोठ्या प्रमाणात झालेली कामे, स्वच्छ सुंदर स्मशानभूमी तसेच गावाजवळ असलेल्या मल्हारा गावात आरोग्य उपकेंद्र आदी सुविधेने परिपूर्ण असलेले गाव आहे. 1994 मध्ये नव्याने स्थापन झालेल्या निमकुंड ग्रामपंचायतमध्ये आजपर्यंत 25 वर्षांत चार सरपंच झाले. नऊ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत विद्यमान सरपंच अनिल अकोले सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवडून आले होते. मात्र, 2021 मध्ये या 25 वर्षांच्या परंपरेला खंड पडला आहे. परिणामी निमकुंड गावाची निवडणूक स्थापनेपासून पहिल्यांदा केवळ एका जागेसाठी होत आहे.

गावबैठकीत व्हायची सरपंच व सदस्यांची निवड -
ग्रामपंचायतच्या स्थापनेपासून गावातील सर्व बांधव हेवेदावे विसरून निवडणुकीच्या वेळेस गावबैठक घेऊन सरपंच व सदस्यांची निवड करीत होते. त्यामुळेच 25 वर्षांत एकदाही निवडणूक झाली नाही. मात्र, यावर्षी एका जागेवर तडजोड न झाल्यामुळे बिनविरोध निवडणुकीचे स्वप्न भंगले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com