पहिल्या तडफदार भाषणाने जिंकले मन, सदस्य म्हणाले त्यांना बोलू द्या

मोहित खेडीकर 
गुरुवार, 19 डिसेंबर 2019

राज्यातील 60 टक्के लोक 40 च्या वयोगटातील आहेत. गेल्या सरकारच्या काळात प्रशासनातील रिक्तपदांची संख्या कमालीची वाढली आहे. रिक्तपदांची टक्केवारी 15 वरून 26 टक्‍क्‍यांवर पोहोचली आहे. त्यामुळे बेरोजगारांना दरमहा मानधन देण्याची व्यवस्था सरकारने करावी. तसेच त्यांना 80 टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी पवार यांनी केली. 

नागपूर : नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यानिमित्त विविध मुद्यांवरून सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र, राजकीय शेरेबाजीला बगल देत एका युवा आमदाराने मुद्देसूद व तडफदार भाषण करून सर्वांचेच मन जिंकले. त्या आमदाराचे नाव आहे, रोहित पवार. रोहित पवार हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू असून, ते पहिल्यांदाच कर्जत-जामखेड मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. 34 वर्षीय रोहित पवार यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर मत मांडताना राजकीय वक्तव्य न करता राज्यातील विविध समास्यांवर भाष्य केले. 

आपल्या 20 मिनिटांच्या भाषणादरम्यान रोहित पवार यांनी तरुणांशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे सभागृहात मांडले. ते म्हणाले, गत पाच वर्षांत शासकीय योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचल्या नसल्याने राज्य विकासापासून वंचित आहे. महाविकास आघाडीचे सरकार सर्वसामान्यांचे सरकार असल्याने येत्या पाच वर्षांत आम्ही सर्वांसाठी कार्य करू.

सभागृहात विरोधकांनी राजकीय वक्तव्य केल्याने सत्ताधारी पक्षातील सदस्यांना त्यांना तशाच प्रकारे उत्तर द्यावे लागले. विरोधी पक्षातील लोक रडीचा डाव मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही आमदार अजूनही शिवसेना आपल्याडे यावी, यासाठी प्रयत्न चालवत आहेत. मात्र, शिवसेनेवर आमचा विश्‍वास आहे. ते मोडतील पण वाकणार नाहीत, असा विश्‍वास पवार यांनी व्यक्त केला. 

ठळक बातमी - #NagpurWinterSession : मुख्यमंत्री महोदय, हे शिवाजी पार्क नाही (व्हिडिओ)

115 पैकी 95 तरुण आमदार महाआघाडीत

सभागृहात 115 आमदार पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. त्यापैकी जवळपास 45 आमदार 40 वर्षे वयोगटातील आहेत. विशेष म्हणजे, 115 पैकी तब्बल 95 आमदार महाआघाडीत आहेत. त्यामुळे राज्यपालांनी त्यांच्या अभिभाषणात बेरोजगारीचा मुद्दा समाविष्ट केल्याने मी त्यांचे अभिनंदन करतो. राज्यातील 60 टक्के लोक 40 च्या वयोगटातील आहेत. गेल्या सरकारच्या काळात प्रशासनातील रिक्तपदांची संख्या कमालीची वाढली आहे. रिक्तपदांची टक्केवारी 15 वरून 26 टक्‍क्‍यांवर पोहोचली आहे. त्यामुळे बेरोजगारांना दरमहा मानधन देण्याची व्यवस्था सरकारने करावी. तसेच त्यांना 80 टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी पवार यांनी केली. 

बेरोजगारीची समस्या गंभीर

कौशल्य विकासाचे राज्यातील सुमारे 2,200 केंद्र बंद पडल्याची माहिती आहे. त्यावर खर्च करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला आहे. राज्यातील बेरोजगारीची समस्या गंभीर बनली आहे. अनेक कारखाने बंद अवस्थेत आहेत. मुलींच्या शिक्षणाचा मुद्दाही अत्यंत महत्त्वाचा आहे. याचबरोबर शिक्षणात देखील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र माघारला असल्याचे रोहित पवार यांनी सभागृहाला सांगितले. 

हेही वाचा - 'अच्छे दिन येईचि ना...' विरोधकांच्या भारूडाला अभंगाने उत्तर

सदस्य म्हणाले, त्यांना बोलू द्या

रोहित पवार बोलत असताना विधानसभा अध्यक्षांनी वेळ संपल्याची सूचना केली. मात्र, त्यांच्या मागे बसलेल्या इतर नव्या आमदारांनी "रोहित पवार चांगले मुद्दे मांडत आहेत, त्यांना बोलू द्या' अशी विनंती विधानसभा अध्यक्षांना केली. त्यामुळे पवार यांना 20 मिनिटे भाषण करता आले. आपल्या संपूर्ण भाषणात त्यांनी अनेक अभ्यासपूर्ण विषय मांडल्याने संपूर्ण सभागृहाने त्यांचे भाषण गंभीरतेने ऐकले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first time MLA rohit pawar delievered impressive speech at vidhan sabha nagpur