प्राणहिता नदीत वाढली परप्रांतीयांची मनमानी, तेलंगाणातील मच्छीमारांचा अहेरीतील लोकांना विरोध

प्रकाश दुर्गे
Saturday, 28 November 2020

तालुक्‍यातील प्राणहिता नदीकाठी वसलेले देवलमरी येथील कोळी बांधव गेल्या अनेक वर्षांपासून प्राणहिता नदीत मासेमारी करत आहेत. मात्र, यंदा तेलंगाणा राज्यातील तलाई गावातील मच्छीमार या नदीत जाळे टाकत आहेत. तसेच देवलमरी येथील मच्छीमार बांधवांना विरोध करत हाकलून लावत आहेत.

अहेरी (गडचिरोली) :  राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्‍याच्या प्राणहिता नदीतील मासेमारीवरून येथे वाग उफाळून आला आहे. तेलंगाणा राज्यातील मच्छीमार महाराष्ट्रातील देवलमरीच्या मच्छीमारांना मासेमारीसाठी विरोध करत आहेत. त्यामुळे याठिकाणी परप्रांतियांची मनमानी सुरू असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा - चांदूर बाजार नगरपालिकेची पोटनिवडणूक, भाजपचा पराभव करत...

तालुक्‍यातील प्राणहिता नदीकाठी वसलेले देवलमरी येथील कोळी बांधव गेल्या अनेक वर्षांपासून प्राणहिता नदीत मासेमारी करत आहेत. मात्र, यंदा तेलंगाणा राज्यातील तलाई गावातील मच्छीमार या नदीत जाळे टाकत आहेत. तसेच देवलमरी येथील मच्छीमार बांधवांना विरोध करत हाकलून लावत आहेत. त्यामुळे त्यांना त्रास करावा लागत आहे. याबाबतची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी तहसीलदार ओंकार ओतारी यांची भेट घेत ही समस्या तत्काळ निकाली काढण्यात यावी, अशी मागणी त्यांच्याकडे केली. गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी यांच्याशी अहेरी परिसरातील विविध समस्यांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी प्राणहिता नदीतील तेलंगाणाच्या मच्छीमारांच्या मनमानीचा मुद्दा प्रकर्षाने मांडला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कंकडालवार यांची देवलमरी येथील मच्छीमारांनी भेट घेऊन आपली समस्या सांगितली. त्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कंकडालवार यांनी या अन्यायग्रस्त नागरिकांना सोबत घेऊन थेट तहसील कार्यालय गाठले. अहेरीचे तहसीलदार ओतारी यांच्याशी चर्चा केली.

हेही वाचा - ५५ हजार हेक्टरवरील तुरीचे पीक संकटात, ढगाळ...

देवलमरी येथील मच्छीमार अनेक पिढ्यांपासून प्राणहिता नदीत मासेमारी करत आहे. असे असतानाही तेलंगाणातील तलाई येथील मच्छीमार आता तेथे मासेमारी करू लागले आहेत. शिवाय केवळ मासेमारी न करता देवलमरीच्या मच्छीमारांना प्राणहिता नदीपात्रात मासेमारी करण्यास मज्जाव करत आहेत. ही बाब देवलमरीच्या मासेमारांवर अन्याय करणारी आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ या प्रकरणी लक्ष घालून देवलमरीच्या अन्यायग्रस्त मासेमारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कंकडालवार यांनी केली. आपण स्वत: या प्रकरणात लक्ष घालू. तसेच या समस्येवर तत्काळ तोडगा काढण्यात येईल, असे आश्‍वासन तहसीलदार ओतारी यांनी दिले. यावेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे, जिल्हा परिषद सदस्य सुनीता कुसनाके, किष्टापूर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अशोक येलमूले, देवलमरीचे गंगाराम तोकला, सत्यम तोकला, गोंगलू तोकला, रवी तोकला, गणेश तोकला, सत्यम मंचर्ल्ला आदि उपस्थित होते.

हेही वाचा - मध्य प्रदेशातून आंध्रात होतेय पशुधन तस्करी; कारवाईत पोलिस दिरंगाई करत असल्याचा आरोप 

वाळूघाटासह सरकारी योजनांवर चर्चा -
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार व तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या या भेटीदरम्यान अनेक समस्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच अनेक महिन्यांपासून रखडलेले वाळूघाट लिलाव, कुटुंब अर्थसाहाय्य व श्रावणबाळ अनुदान योजनेबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fisher man from telangana oppose to fisherman from aheri of maharashtra for fishing in pranhita river