चांदूर बाजार नगरपालिकेची पोटनिवडणूक, भाजपचा पराभव करत पालिकेवर प्रहारचा झेंडा

शरद केदार
Saturday, 28 November 2020

भाजप 7, प्रहार 4, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2, अपक्ष 4 असे पालिकेचे संख्याबळ आहे. नितीन कोरडे यांना प्रहार, राष्ट्रवादी व तीन अपक्षांची साथ मिळाल्याने ते नगराध्यक्षपदी विराजमान झाले.

चांदूर बाजार (अमरावती ) :  स्थानिक नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत प्रहार गटाचे नितीन कोरडे यांची वर्णी लागली. त्यांना प्रहार, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष, अशी 9 नगरसेवकांची मते मिळाली, तर भाजपचे गोपाल तिरमारे यांना 8 मते मिळाले. विशेष म्हणजे पालिकेत भाजपचे सर्वाधिक नगरसेवक असूनही भाजपला सत्ता टिकवून ठेवण्यात अपयश आले.

नगराध्यक्ष रवींद्र पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी आज नगरपालिका सभागृहात पोटनिवडणूक घेण्यात आली. यामध्ये भाजपतर्फे गोपाल तिरमारे, तर प्रहार गटातर्फे नितीन कोरडे यांनी अर्ज दाखल केले होते. दिवंगत नगराध्यक्ष रवींद्र पवार हे थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडून आले होते. मात्र, त्यांचा निधनानंतर रिक्त जागेवर आज झालेल्या निवडणुकीत प्रहार गटाचे नितीन कोरडे यांची 9 नगरसेवकांचे समर्थनाने निवड झाली, तर भाजपचे गोपाल तिरमारे यांना 8 मते मिळाली.

हेही वाचा - काय सांगता! आज रविवार आहे, अंत्यसंस्कार विधी होणार नाही! ही आहे अडचण

हात उंच करून करण्यात आले मतदान - 
भाजपचे गोपाल तिरमारे यांच्या बाजूने अतुल रघुवंशी, विजय विल्हेकर, टिकू अहीर, मीना काकडे, मीरा खडसे, वैशाली घुलक्षेसह अपक्ष मनीष नांगलिया यांनी कौल दिला, तर नितीन कोरडे यांच्या बाजूने सरदार खा, फातिमा बी, उषा माकोडे, वैशाली खोडपे, आबिद हुसेन, चंदा खंडारे, लविना अकोलकर, नजीर कुरेशी यांनी हात उंचावल्याने नऊ विरुद्ध आठ मतांनी नितीन कोरडे यांनी ही निवडणूक जिंकली. नितीन कोरडे यांचा विजय जाहीर होताच प्रहार कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

हेही वाचा - अमरावती मुख्यालयातील सहाय्यक आयुक्तपद रद्द, मनपात शीतयुद्ध पेटण्याची शक्यता

अपक्ष नगरसेवकांची साथ -
भाजप 7, प्रहार 4, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2, अपक्ष 4 असे पालिकेचे संख्याबळ आहे. नितीन कोरडे यांना प्रहार, राष्ट्रवादी व तीन अपक्षांची साथ मिळाल्याने ते नगराध्यक्षपदी विराजमान झाले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nitin korade won the chandur bazar corporation election in amravati