मध्य प्रदेशातून आंध्रात होतेय पशुधन तस्करी; कारवाईत पोलिस दिरंगाई करत असल्याचा आरोप 

राजकुमार भितकर 
Saturday, 28 November 2020

मध्य प्रदेशातून आंध्र प्रदेशात होणाऱ्या पशुधनतस्करीचा पर्दाफाश वारंवार झाला आहे. मात्र, तस्करीला आळा घालण्यात अद्यापपर्यंत यश आलेले नाही. शेतकरी व पशुपालकांकडून कवडीमोल भावात पशुधन खरेदी केले जाते. एका वाहनात निर्दयपणे कोंबून पशुधनाची वाहतूक केली जाते. 

यवतमाळ : राज्यात गोहत्येला बंदी घालण्यात आली आहे. गोवंशतस्कर मध्य प्रदेशातून कवडीमोल भावात पशुधनाची खरेदी करून आंध्र प्रदेश व तेलंगणात तस्करी करीत आहेत. रात्रीच्या सुमारास महामार्गावर धावणाऱ्या ठराविक वाहनांवरच कारवाई केली जात असल्याचा आरोप होत आहे. त्यात मास्टरमाइंड म्होरके अडकत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

मध्य प्रदेशातून आंध्र प्रदेशात होणाऱ्या पशुधनतस्करीचा पर्दाफाश वारंवार झाला आहे. मात्र, तस्करीला आळा घालण्यात अद्यापपर्यंत यश आलेले नाही. शेतकरी व पशुपालकांकडून कवडीमोल भावात पशुधन खरेदी केले जाते. एका वाहनात निर्दयपणे कोंबून पशुधनाची वाहतूक केली जाते. 

हेही वाचा - काय सांगता! आज रविवार आहे, अंत्यसंस्कार विधी होणार नाही! ही आहे अडचण

यात मध्य प्रदेश, नागपूर, कळंब, यवतमाळ, पांढरकवडा इत्यादी प्रमुख शहरांमधील तस्करांची साखळीच जुळली आहे. कारवाई टाळण्यासाठी खात्यातीलच काही कर्मचारी त्यांच्या गळाला लागलेले आहेत. त्या तस्करीतही कमालीची स्पर्धा वाढली आहे. स्पर्धक व्यावसायिकांवर कारवाईसाठी तस्करांकडूनच टीप दिली जाते. त्यानुसार कारवाई होत असल्याचे सांगितले जाते. 

बड्या मास्यांना तस्करीत मोकळीक मिळत असल्याची चर्चा आहे. मध्य प्रदेशातून नागपूर, कळंब, यवतमाळ, पांढरकवडामार्गे आंध्र प्रदेश व तेलंगणात पशुधनाला वाहनात कोंबून नेले जाते. वणी, महागाव, झरी हा मार्गही तस्करीसाठी सुरक्षित मानला जातो. महामार्गावर पोलिस राहत असले तरी त्यांच्याकडून गांभीर्याने तपासणी होत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जाणून घ्या - पन्नासावर सुवर्णपदके जिंकून देणारी आंतरराष्ट्रीय महिला पॉवरलिफ्टरला करावा लागतोय हा व्यवसाय

आलिशान वाहनातून प्रवास

एका ट्रकमध्ये काही हजारांत खरेदी केलेल्या पशुधनाला कोंबले जाते. कत्तलीसाठी लाखो रुपयांत विक्री केली जाते. त्यात कोट्यवधींची उलाढाल होते. पोलिसांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी तस्कर आलिशान कारमधून प्रवास करतात. पुढे वाहन व मागे ट्रक धावतात. मोबाईलच्या माध्यमातून म्होरके व चालक एकमेकांच्या संपर्कात राहतात. एखादवेळी कारवाई झाल्यास केवळ चालकच त्यात अडकतात.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Smuggling of pet animals going on from madhya prasdesh to andhra pradesh