मच्छीमाराच्या जाळ्यात अडकला अजगर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

मासेमारी करताना एका मच्छीमाराच्या जाळ्यात मासोळीऐवजी अजगर अडकल्याची घटना तालुक्‍यातील गडीसुर्ला येथे मंगळवारी (ता. 21) घडली. बुधवारी (ता.22) अजगराला सुखरूपपणे केळझरच्या जंगलात सोडण्यात आले.

मूल (जि. चंद्रपूर) - मासेमारी करताना एका मच्छीमाराच्या जाळ्यात मासोळीऐवजी अजगर अडकल्याची घटना तालुक्‍यातील गडीसुर्ला येथे मंगळवारी (ता. 21) घडली. बुधवारी (ता.22) अजगराला सुखरूपपणे केळझरच्या जंगलात सोडण्यात आले.

गडीसुर्ला येथे गावाजवळच्या तलावामध्ये मंगळवारी सामूहिकरीत्या मासेमारी सुरू होती. गावात विकण्यासाठी आणि मूल येथील बुधवारच्या आठवडे बाजारानिमित्त येथील मच्छीमार सोसायटीतर्फे मासेमारी करण्यात येत होती. तलावातील पाण्यात उतरून मासेमारी करताना एका मच्छीमारास जाळ्यामध्ये जड वस्तू लागल्याचा आभास झाला. ही गोष्ट त्याने इतरांना सांगितली. आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने जाळे तलावाच्या काठापर्यंत आणल्यानंतर त्यात चक्क अजगर निघाला. या वेळी उपस्थित मच्छीमारांमध्ये एकच खळबळ उडाली. गावातील लोकांनीसुद्धा तलावाकडे धाव घेत अजगर पाहण्यासाठी गर्दी केली. गडीसुर्ला येथील उपसरपंच येनूरकर यांनी तत्काळ वन्यजीव अभ्यासक आणि सर्पमित्र उमेश झिरे यांना माहिती दिली. उमेश झिरे, तन्मय झिरे यांनी घटनास्थळ गाठून जाळ्यात अडकलेल्या अजगराची सुरक्षित सुटका केली. जाळ्यात अडकलेला अजगर साडेसात फूट लांब आणि सात किलो वजनाचा होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fisher Python Receive Forest