पेंच प्रकल्पातील वन कर्मचाऱ्यांवर मासेमारांनी केला जीवघेणा हल्ला, जवानांचा सुरक्षेसाठी गोळीबार  

Fishermen Attack Forest employee at Pench Tiger Project,
Fishermen Attack Forest employee at Pench Tiger Project,


नागपूर :  तोतलाडोह जलाशयात अवैध मासेमारीविरुद्ध गस्त करीत असलेल्या पथकावर रविवारी रात्री तुमडीमट्टा संरक्षण कुटीवर साठ ते सत्तर मासेमाऱ्यांनी दगडफेकीसह डायनामाईटचा वापर करून हल्ला केला. कुटीमध्ये घुसून गॅस सिलिंडर काढून स्फोट करण्याचा प्रयत्न केला. शासकीय साहित्याची तोडफोड केल्याने जीवाच्या सुरक्षेसाठी मासेमाऱ्यांवर विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या जवानाने गोळीबार करून कुटीत अडकलेल्या वन कर्मचाऱ्यांची पथकाने सुटका केली. 


पेंच व्याघ्र प्रकल्पातील तोतलाडोह जलाशयात अवैध मासेमारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रविवारी (१ नोव्हेंबर) रात्री विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे वन कर्मचारी गस्त घालत होते. दक्षिण बोदलझिरा नियतक्षेत्रातील तुमडीमट्टा संरक्षण कुटी येथे जेवण करण्यासाठी गस्ती पथक थांबले. त्या संधीचा फायदा घेऊन ३०-४० बोटीच्या सहाय्याने अंदाजे ६०-७० लोकांनी संरक्षण कुटीस घेरले आणि शिवीगाळ करत दगडफेक करून हल्ला केला. तसेच डायनामाईटचा वापर सुरू केला. काही मासेमाऱ्यांनी पत्र्याच्या शेडमध्ये घुसून शासकीय साहित्याची तोडफोड सुरू केली. तसेच छतावर चढून सोलर पॅनलची नासधूस केली. आत शिरलेल्या काही जणांनी किचनमधील गॅस सिलिंडर काढून त्याचा स्फोट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे स्वतःला आणि इतरांच्या जिवाच्या सुरक्षेसाठी विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या जवानांनी आतून गोळीबार केला. गोळीबार सुरू झाल्याने मासेमारांनी पाण्यात उभी असलेली शासकीय बोट सोबत नेली आणि बोट जाळली. 

वन परिक्षेत्र अधिकारी यांचे वन विभागाचे अतिरिक्त मनुष्यबळ आल्यानंतर कुटीजवळील भागाची पाहणी केली. दरम्यान, कुटीत बंदिस्त असलेल्या सहकाऱ्यांची सुटका केली. या घटनेचा वन गुन्हा नोंद केला आहे. तपास पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक अमलेंदू पाठक यांच्या मार्गदर्शनात तापस सहायक वन संरक्षक अतुल देवकर, वन परिक्षेत्र अधिकारी मंगेश ताटे आणि क्षेत्र सहाय्यक एस. बी. केकान करत आहेत. 
 
सततच्या कारवाईमुळे संताप 

काही महिन्यांपासून अवैध मासेमारी विरुद्ध दोन्ही राज्यांनी प्रभावी काम करून मासेमाऱ्यांचा बंदोबस्त केला होता. रामटेकचे उपविभागीय अधिकारी ज्योगेंद्र कट्यारे यांनी जलाशयाला भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली होती. मध्य प्रदेश वन विभागाने सहा ऑक्टोबरला अवैध मासेमारी करून मासे वाहतूक करणारी तीन वाहने जप्त केली, पाच लोकांना अटक केली होती. महाराष्ट्र वन विभागाच्या वतीने अनेक बोटी आणि जाळे जप्त करून कारवाई केली होती. यामुळे हे कृत्य केल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com