अल्पवयीन मुलीचे चार वर्षे केले शोषण अन् ती झाली गर्भवती...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 April 2020

मोर्शी तालुक्‍याच्या एका गावात अल्पवयीन मुलीचा चार वर्ष लैंगिक छळ करून तिच्यावर बळजबरी करण्यात आली.  अन्य चार घटनांमध्ये त्या महिलांवर बळजबरी करण्याचा प्रयत्न झाला. तीन घटना ग्रामीणमध्ये, तर दोन आयुक्तालयाच्या हद्दीत घडल्या.

अमरावती : जगभर कोरोनाचे भीषण संकट थैमान घालत असतानाही महिलांवरील अत्याचार कमी होण्याचे नाव घेत नाहीत.
मोर्शी तालुक्‍याच्या एका गावात अल्पवयीन मुलीचा चार वर्ष लैंगिक छळ करून तिच्यावर बळजबरी करण्यात आली.  अन्य चार घटनांमध्ये त्या महिलांवर बळजबरी करण्याचा प्रयत्न झाला. तीन घटना ग्रामीणमध्ये, तर दोन आयुक्तालयाच्या हद्दीत घडल्या.
मोर्शी ठाण्याच्या हद्दीतील संशयित आरोपी लवकेश विजयराव चिखले (वय 23) हा चार वर्षापासून पीडित अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करीत होता. तिच्याशी बळजबरीचे संबंध ठेवल्यामुळे पीडितेला गर्भधारणा झाली. पीडितेसह तिच्या पालकांनी लवकेश याला लग्न करण्यासंदर्भात म्हटले असता, त्याने लग्नास नकार दिला. अखेर पीडितेने मोर्शी ठाण्यात तक्रार नोंदविली असता, लवकेशविरुद्ध अत्याचा-यासह ऍट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
दुसरी घटना धारणी तालुक्‍याच्या एका गावात घडली. पीडित महिला (वय 30), आपल्या अल्पवयीन मुलीसोबत बकऱ्या चारण्यासाठी जंगलात गेली होती. संशयित आरोपी शेख रफिक बाबू मिस्त्री याने अल्पवयीन मुलीशी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने आरडाओरड केली असता, शेख रफिकने तेथून पळ काढला. पीडित मुलीच्या आईने चौकशी केली असता, शेख रफिकने तिला धमकी दिली. धारणी पोलिसांनी शे. रफिकविरुद्ध गुन्हा दाखल केला.
तिसरी घटना तळेगाव दशासर ठाण्याच्या हद्दीत एका गावात घडली. पीडित महिला (वय 20) घरात झोपली असताना, संशयित आरोपी श्रीकृष्ण विठोबा बढे यांनी घरात घुसून छेडखानी केली. पीडितेने आरडाओरड केली असता, बढेने तेथून पळ काढला. पीडितेच्या तक्रारीवरून तळेगाव दशासर ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

सविस्तर वाचा - शौकिनांनो सावधान! बनावट तंबाखू खाणे उठू शकते जीवावर
फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील गावात एक महिला बकऱ्या चारण्यासाठी जंगलात गेली असता, बाळू सोपान मोहोड (वय 40) याने तिचा विनयभंग केला. शिवीगाळ केली. आरडाओरड केल्याने बाळूने पळ काढला. फ्रेजरपुरा पोलिसांनी बाळूविरुद्ध गुन्हा दाखल केला. वलगाव हद्दीत एका गावात विवाहितेशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करून छेडखानी केली. पीडितेने पतीला घटनेविषयी सांगितले असता पतीने संशयित राजेश पळसपगार याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता, त्याने पीडितेच्या पतीला मारहाण करून जखमी केले. पीडितेच्या तक्रारीवरून वलगाव पोलिसांनी राजेशविरुद्ध गुन्हा दाखल केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five cases of women abused in Amarawati