थोडासा दिलासा! पाच कोरोनाबाधित झाले बरे!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 May 2020

जिल्ह्यात आत्तापर्यंत 28 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी 5 जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयातून सुट्टी देण्यात आला. यावेळी त्यांना जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

गडचिरोली : कोरोनाचे युद्ध अपरिहार्य आहे आणि सगळेच ते लढताहेत. कोरोनाच्या सावटात जगताना एक दिलासादायक बातमी आली असून गडचिरोली जिल्ह्यातील पहिले पाच कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. कोरानातून बरे होणे ही रुग्णांसाठी, त्यांच्या नातेवाईकांसाठी आणि इतरांसाठीही खूपच आनंदाची बातमी आहे. त्यामुळेच या बऱ्या झालेल्या रुग्णांना गुरुवारी (ता.28) टाळ्यांच्या गजरात निरोप देण्यात आला. जिल्ह्यात आत्तापर्यंत 28 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी 5 जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयातून सुट्टी देण्यात आला. यावेळी त्यांना जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल रूढे व इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बरे झालेल्या रूग्णांमध्ये कुरखेडा येथील पहिले चार रुग्ण व चामोर्शी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. या पाचही रुग्णांना आरोग्य कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात निरोप देऊन रुग्णवाहिकेने त्यांना त्यांच्या घरी सोडण्यात आले. यापुढे त्यांना सात दिवस गृह विलगीकरणात राहणे अनिवार्य करण्यात आले असून आरोग्य विभागाकडून त्यांच्या लक्षणांबाबत निरीक्षणे नोंदवली जाणार आहेत. कोरोनातून बरे झालेले रुग्ण 18 व 19 मे दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले होते.

सविस्तर वाचा - ठोसे लगावत तिने गाठले यशोशिखर
उर्वरित 23 कोरोनाबाधित रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून सर्व रुग्ण उपचारास प्रतिसाद देत असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रुढे यांनी सांगितले. रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेल्या सर्व रुग्णांना सॅनिटेशन कीट व गृह विलगीकरणाचे कीट सोबत देण्यात आले आहे. नागरिकांनी आता कोरोना रुग्णांशी नाही तर कोरोना आजाराशी लढायचे आहे. गडचिरोली जिल्हा पुन्हा ग्रीन झोनमध्ये येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करवे असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी यावेळी केले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five corona positives recovered in Gadchiroli