पाच स्तंभ स्वातंत्र्याचे साक्षीदार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

रामटेक (जि.नागपूर): येथील पंचायत समितीसमोरचे पाच स्तंभ भारताला मिळालेल्या स्वातंत्र्याचे व त्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांचे स्मरणस्थळ ठरले आहे. लकडगंज येथील जयस्तंभाच्या जागी नगर परिषद व्यावसायिक संकुल उभारत असून त्यासाठी स्वातंत्र्याच्या आठवणी जपणारा जयस्तंभ जमीनदोस्त करण्यात आला आहे. 

पंचायत समितीच्या पायऱ्यांच्या उजव्या बाजूस एक स्तंभ आहे. संगमरवरी पांढऱ्या शुभ्र दगडावर समोरील बाजूस संविधानाची प्रास्ताविका आहे. मागील बाजूला 13 ऑगस्ट 1942 रोजी रामटेकला "एक दिवसाचे स्वातंत्र्य "मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांची नावे कोरलेली आहेत. पायऱ्यांच्या डाव्या बाजूला असेच चार स्तंभ आहेत. त्यावर दोन्ही बाजूला स्वातंत्र्यवीरांची नावे कोरलेली आहेत. रामटेकवासींनी जपून ठेवावयाचे हे स्तंभ आहेत. असाच एक जयस्तंभ लकडगंज येथे होता. 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्याची खूण म्हणून हा विटांचा जयस्तंभ उभारला गेला होता. 15 ऑगस्टला सर्व गावकरी जयस्तंभासमोर जमले होते. तिरंगा फडकाविण्यात आला होता. 30 जानेवारी 1948 रोजी गांधीजींची हत्या झाली. गावकऱ्यांनी एकत्र येऊन श्रद्धांजली वाहिली. गांधीजींच्या तेरवीला सर्वांनी एकत्र येऊन गावजेवण दिले होते. अनेकांनी मुंडण करून गांधीजींना श्रद्धांजली दिली होती. 
मात्र, नगर परिषदेने या छोट्याशा जागेवर व्यापारसंकुल उभारण्याचा निर्णय घेतला. कंत्राटदाराने (जो रामटेकचाच आहे) हा जयस्तंभ जमीनदोस्त करून त्याबरोबरच रामटेकवासींच्या आठवणींना मूठमाती दिली. रामटेकच्या स्वातंत्र्यवीरांनी अनन्वित अत्याचार सहन करून रामटेकला एक दिवसाचे स्वातंत्र मिळवून दिले होते त्यांची स्मृती जपली गेली पाहिजे, असे मत रामटेकवासी नोंदवित आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The five pillars bear witness to freedom