अभियंत्यांना मिळणार हमखास नोकरी

मंगेश गोमासे
मंगळवार, 11 एप्रिल 2017

'आउटकम बेस' अभ्यासक्रम - देशातील पहिलाच प्रयोग

'आउटकम बेस' अभ्यासक्रम - देशातील पहिलाच प्रयोग
नागपूर - देशात अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या 50 टक्के विद्यार्थ्यांना नोकरी मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने (एमएसबीटीई) येत्या जूनपासून उद्योगांना हव्या असलेल्या कौशल्यावर आधारित "आउटकम बेस' नावाचा नवा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पाचव्या आणि सहाव्या सेमिस्टरमध्येच विद्यार्थ्यांना विविध उद्योगांत नोकरीची हमखास संधी उपलब्ध होणार आहे.

कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम देशभरातील विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांकडून शिकविला जात नसल्याची ओरड उद्योगांकडून होत असते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौशल्यविकासाची कास धरण्याचे आवाहन केले. त्यासाठी ठिकठिकाणी कौशल्य विकासासाठी उपक्रम आणि त्यावर आधारित अभ्यासक्रम तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. मुळात विद्यापीठांकडून अद्याप त्याची सुरुवात झाल्याचे दिसून येत नाही. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने गेल्या वर्षीच यादृष्टीने पाऊल टाकून पन्नास ते साठ विविध उद्योगातील तज्ज्ञ आणि अभ्यासक्रमातील तज्ज्ञांचा समावेश करुन नवा अभ्यासक्रम तयार करण्यात सुरुवात केली. अभ्यासक्रम तयार करताना उद्योगातील तज्ज्ञांनी अभ्यासक्रमात बराच बदल करून कौशल्यविकास, उद्योगानुरूप गोष्टींचा समावेश केला. तयार झालेला अभ्यासक्रम जूनपासून प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. विद्यार्थी पाचव्या आणि सहाव्या सेमिस्टरला जाताच त्याला उद्योगांमध्ये "इंटर्नशिप'ही करावी लागणार आहे. त्यातून विद्यार्थ्याला त्या किंवा इतर उद्योगांमध्ये सहजरीत्या नोकरी मिळेल. महत्वाची बाब म्हणजे आतापर्यंत अशाप्रकारचा अभ्यासक्रम तयार करणारे पहिलेच मंडळ असल्याचे समजते.

विद्यापीठ, तंत्रशिक्षण संचालनालय अद्याप मागेच
एमएसबीटीईने तयार केलेल्या नव्या अभ्यासक्रमाने विद्यार्थ्यांना बराच फायदा होणार आहे. मात्र, विद्यापीठ आणि उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयाकडून अद्याप अशा प्रकारची सुरुवात झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे उद्योगांना हवे असलेला मनुष्यबळ मिळत नसल्याचे दिसून येते.

विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करण्याच्या दृष्टीने उद्योगांची मदत घेऊन हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. त्यासाठी एल ऍण्ड टी, टाटा आणि इतर उद्योगांतील तज्ज्ञांनी बरीच मदत केली. आता अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांचे "अच्छे दिन' येतील.
- अभय वाघ, संचालक, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ

Web Title: fix job for engineer